नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने
ऑगस्ट-सप्टेंबर महिने म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या दैवतेच्या आगमनाची चाहूल आणि लगबग दोन्ही एकत्र घेऊन येणारे महिने. अशातच पर्यावरण जपून गणपती बाप्पांची शाडूची मूर्ती बनवण्याकडे वाढता कल लक्ष वेधून घेणारा असतो. विविध ग्रुप ऑनलाईन किंवा ऑफलाईन गणपती मेकिंग वर्कशॉप (पैसे घेऊन किंवा स्वेच्छेने) घेत असतात. रोटरी क्लब ऑफ खारघर, या रोटरीच्या शाखेने असाच एक पर्यावरण प्रेमी गणपती मूर्ती बनवण्याचा वर्कशॉप २५ ऑगस्ट २०२४ रोजी घ्यायचे जाहीर केले. हा वर्कशॉप फेसबुक लाईव्ह आणि गूगल मीट वर होणार होता. मी या वर्कशॉपची खूप उत्सुकतेने वाट बघत होतो कारण गेली काही वर्षे मला घरीच मूर्ती बनवावीशी इच्छा होती. पण हस्तकला आणि माझं लहानपणापासून काहीतरी बिनसलं आहे त्यामुळे कोणी शिकवणारा पाहिजे होता. ती संधी आपसूक चालून आली. योगायोगाने पुण्याला गेलो असताना मला एका हार्डवेअर दुकानात आकस्मितरित्या शाडूची मातीही मिळाली. साठ रुपयांना दोन किलो! ठरल्या प्रमाणे २५ ऑगस्टला मी आणि ओम (माझा आठवीत असलेला सुपुत्र) दोघांनी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली आणि टॅब समोर आसनस्थ होऊन गणपती बाप्पा बनवायला सुरुवात केली....