व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

अयोध्या राम जन्मभूमी, १४ डिसेंबर २०२५

आम्ही राम मंदिरमध्ये सुगम दर्शनाचे आगाऊ बुकिंग करून ठेवले होते. वेळ होती सकाळी ९ ते ११. सकाळी राहत्या ठिकाणी वीजने धक्का दिला आणि गायब झाली. त्यामुळे सकाळी नऊ ऐवजी दहा वाजता मी, शीतल आणि ओम देवळाकडे जाणाऱ्या पथावर पोचलो. मजल दरमजल करत, एकेक सुरक्षा चौकी ओलांडत राम मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होतो. आणि काही वेळाने समोर बदामी रंगाचे राम मंदिर दृष्टीक्षेपात आले. देवळाच्या छतावर कामगार किंवा कारागीर काम करताना दिसत होते म्हणजे अजून देऊळ पूर्ण झाले नव्हते. आजूबाजूचा परिसरातही जोमाने काम चालू असलेले दिसले. कमीत कमी पुढची २-३ वर्षे तर पूर्ण होण्यासाठी लागणार हे नक्की. 

हा शेवटचा सुरक्षा थांबा. इथे मोबाईल, बेल्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू लॉकर मध्ये ठेवाव्या लागतात.
त्यामुळे इथून पुढे फोटो बंद.

काही वेळातच हळू हळू, एकेक पाऊल पुढे सरकवत आम्ही देवळात शिरलो. भिंतींवर रथावर आरूढ  सूर्य देवाची मूर्ती, दुसरीकडे राम सेवेत मग्न हनुमान आणि इतर देवता बघत उभे राहिलो. रांगेत उभे असताना डावीकडे थोड्या पायऱ्या चढून वर काही भक्त जात होते. सुरक्षारक्षकाला विचारलं तर समजलं की तिथे राम दरबार आहे आणि आम्ही रांगेतून चाललो होतो तिथे राम लल्ला आहेत. पुढील पाच मिनिटात आम्ही देवळाच्या आत गेलोही.

पूर्ण देऊळ आलेल्या लोकांच्या आणि विशेष करून शाळकरी मुलांच्या खणखणीत 'जय श्री राम' घोषणांनी भरून गेले होते. त्यांचा उत्साह आणि रामाप्रती आकर्षण आणि भक्ती स्पष्ट जाणवत होती.

संथ गतीने आम्ही गर्भगृहाच्या जवळ पोचत होतो. आणि अचानक एका वळणावर तो क्षण आला आणि त्या बदामी रंगाच्या भिंतीमधून समोर दहा बारा फुटांची काळी, पूर्ण पाषाणाची श्री रामाची मूर्ती दिसली.

ज्या क्षणी रामाचे दर्शन झाले त्या क्षणी आपसूकपणे माझे डोळे बंद झाले. एक वेगळ्या अनुभूतीने माझ्या शरीराचा ताबा घेतला. अंग शहारले, अचानक हलके वाटू लागले. दुसऱ्या क्षणी डोळे उघडले तर श्री राम अस्पष्ट दिसत होते. माझे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते.

हात जोडून नमस्कार केला आणि मनोमन विष्णू देवांना धन्यवाद म्हंटल. कारण अयोध्या ट्रिप ठरली त्यानंतर एके दिवशी विष्णू स्तोत्र वाचून संपताच मी व्यंकटेश बाप्पांपाशी इच्छा व्यक्त केली होती... जेव्हा मी राम मंदिरात जाईन, तेव्हा मला श्री रामाचे दर्शन होऊ दे, एक वेगळी अनुभूती येऊ दे!

वास्तविक त्या दिवसापासून ते राम मंदिरात रामाचे दर्शन होईपर्यंत मी हे साफ विसरून गेलो होतो. पण जेव्हा दर्शन घेऊन बाहेर देवळाच्या पायरीवर विसावलो तेव्हा पहिली गोष्ट माझ्या डोक्यात आली ती होती व्यंकटेश बाप्पांपाशी व्यक्त केलेली माझी इच्छा! 

आम्ही राहत असलेल्या पारिजात होम स्टे च्या जिन्यावरून टिपलेला राम मंदिरचा नजारा 


त्याच होम स्टेच्या जिन्यावर 
- धवल रामतीर्थकर







Comments

Popular posts from this blog

फासे पारध्यांची गोडी

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने