अक्षीच्या दैवतांच्या गोष्टी
आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. एक आहे देवांची आणि दुसरी दानवांची. हे दोघे, देव-दानव राहतात एकाच गावात, अक्षी त्याचे नाव. पण ते गुण्यागोविंदाने राहत असतील की आणि कसे राहत असतील ते तुम्हीच ठरवा.
कोरोना काळात फारसे भ्रमण शक्य झाले नसल्यामुळे डिसेंबरची अल्हाददायक सुट्टी निरर्थक वाया गेली. आला मार्च महिना, मुलगा ओम याला सुट्टी मिळाली, पत्नी शीतलनेही वार्षिक सुट्ट्या संपवण्यासाठी सुट्टी घेतली आणि आमची अलिबाग मधील अक्षी बीच वर ट्रिप नक्की झाली.
१९ मार्च २०२१ला सकाळी आम्ही (मी, शीतल, ओम, शीतलची बहीण सुप्रिया आणि तिचे पती निलेश) असे पाच जण अक्षी येथील हॉटेल सी ब्लिस (आधीचे हॉटेल सूर्यकिरण) मध्ये जेवणाच्या वेळेस पोहोचलो. त्यांच्या सुंदर, स्वच्छ, रंगवलेल्या नारळाच्या आणि सुपारीच्या माडीमध्ये चविष्ट जेवण झाले, दुपारी तासभर झोप झाली आणि संध्याकाळी अक्षी बीचवर सोनेरी सूर्यास्ताचा आनंद लुटत समुद्रात डुंबूनही झाले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २० मार्च २०२१ पांडवकालीन कनकेश्वर देवळात ६५० पायऱ्या चढून शंकराचे दर्शन घेऊन आलो आणि संध्याकाळी ५.३० च्या सुमारास अक्षी गावाच्या दर्शनास बाहेर पडलो. राणी म्हणजेच सुप्रिया कनकेश्वर चढाई करून पूर्ती दमली असल्यामुळे मी, शीतल, निलेश आणि ओम अशी चौकडी अक्षी दर्शनास निघाली.
हॉटेलवर येता जाता आम्ही वाटेत बरीच सुंदर देऊळे बघण्याचे हेरून ठेवली होती. ती आता निवांतपणे पालथी घालायचा बेत ठरला आणि आम्ही दोन पायांवर मार्गस्थ झालो.
समोर एक अत्यंत जीर्ण झालेला, लाकडी बांधकाम असलेला कौलारू वाडा किंवा घर उभे होते. बाहेर एक छोटी पाटी लावलेली, 'विठ्ठल रखुमाई मंदिर'
कडी काढून आत गेलो तर गाभाऱ्यात दोन प्राचीन अशा विठ्ठल आणि रखुमाईच्या दगडी मूर्ती स्थापित दिसल्या. त्यांना वस्त्रे नेसवलेली असल्यामुळे त्यांचे पूर्ण मोहक रूप झाकले गेले होते, पण चेहेराच एवढा सुरेख कोरला होता की लगेच कळावे की ही विठ्ठल-रखुमाईच्या जोडी आहे.
![]() |
| आधी |
![]() |
| आता |
गाभाऱ्याच्या बाहेर एक नंदी होता. जोशी नंदीजवळ गेले आणि म्हणाले, "शंकराचे दर्शन कसे घ्यायचे माहीत आहे का?" असं म्हणून त्यांनी डाव्या हाताची दोन बोटे (अंगठा आणि तर्जनी) नंदीच्या दोन शिंगांवर ठेवली आणि उजवा हात नंदीच्या शेपटीवर ठेवला. खाली वाकून त्यांनी शिंगांवर ठेवलेल्या दोन बोटांच्या मधून पलीकडे बघितले की समोर शंकराचे पिंड दिसते. ही प्रथा किंवा पद्धत आम्हाला आता, या क्षणी ज्ञात झाली होती, तर जोशींनी जेव्हा या मूर्ती परत स्थापित केल्या तेव्हा आलेल्या गुरुजींकडून ही पद्धत कळाली.
असे बराच वेळ बोलत बोलत आम्ही शेवटी एस. टी. महामंडळातून निवृत्त झालेल्या जोशींचा निरोप घेतला. आणखी पुढे जायचे होते, आणखी अक्षी बघायचे होते.
गाभाऱ्यात पांढऱ्या टाईल्स मध्ये एक सुबकशी संगमरवरी गणपतीची मूर्ती होती. सवयीप्रमाणे निलेशने भराभर गाभाऱ्याचे आणि मूर्तीचे फोटो काढले. आणि मग त्यांचे लक्ष गेले मूर्तीकडे. "अर्रे ही उजव्या सोंडेची गणपती मूर्ती आहे!", आश्चर्ययुक्त भीतीने भरलेल्या स्वरात त्यांनी मूर्तीचे अस्तित्व नोंदविले. आणि पुढच्याच क्षणी, "उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे खूप कडक असते. याचे फोटो ही काढायचे नसतात", हा साक्षात्कार झाला आणि जेवढ्या भराभर त्यांनी फोटो काढले होते तेवढ्याच किंवा त्याहून भराभर त्यांनी या गणपतीचे सगळे फोटो मोबाईल मधून डिलिट केले. या प्रतिक्रियेमुळे ओमच्या चिमुकल्या मनावरही हे ठसले गेले की उजव्या सोंडेच्या गणपतीचे फोटो काढायचे नाहीत. काढलेले चांगले नाही, म्हणजेच काहीतरी वाईट होते. आता त्याची विचारशक्ती जेव्हा जागृत होईल तेव्हा काय मानायचे आणि काय नाही हे तोच ठरवेल.
![]() |
| मी असे काही मानत नाही, म्हणून हा फोटो |
तेवढ्यात माझे लक्ष कोपऱ्यात असलेल्या लाईट बोर्ड कडे गेले. त्यावर एक गोलाकार, कुठेही न दिसणारा असा फॅनचा रेग्युलेटर विराजमान होता. त्याचा गोल आकार, घड्यातल्या आकड्यांसारखे लिहिलेले आकडे आणि पांढऱ्याचा झालेला पिवळा रंग बघून सहज काळात होते की हे काही साधे सुधे रेग्युलेटर नाही. बाजूच्या भिंतींकडे बघितले तर खिडक्या ही लाकडी, त्यांचे दरवाजेही लाकडी आणि खिडक्यांचे गजही लाकडीच, आणि ते ही जुन्या काळातले लाकूड. म्हणजे हा ही प्राचीन वाडाच होता तर.
प्रदक्षिणा मारायला डावीकडून सुरुवात केली आणि मागच्या बाजूला गेलो तर मागे एक विलक्षण पाण्याची टाकी दिसली. दोन लोखंडी नक्षी केलेल्या खांबांवर एक सिमेंटची टाकी तग धरून बसली होती. ती इतकी वर्षे या लोखंडी खांबांवर तोल सांभाळत बसली होती की ते लोखंडी खांब सिमेंट मध्ये चक्क रुतले गेले होते.
उजवीकडे बघितले तर एक मोठे देऊळ, आणि त्यावर मोठी पाटी, 'काळंबा देवी मंदिर'. देऊळ तसे नवीन दिसत होते. चकचकीत आणि भारदस्त झुंबर असलेल्या सभामंडपाने आमचे स्वागत केले. गर्भगृहात काळा ऑइल पेंट मारलेल्या देवीच्या २ मूर्ती होत्या, अर्थात वस्त्र नेसलेले असल्यामुळे पूर्ण रूप दिसले नाही. पण या गोऱ्यागोमट्या देवी नव्हत्या म्हणजे कदाचित प्राचीन असाव्यात.
देवळाच्या बाहेर आलो की उजवीकडे गजलक्ष्मीचे छोटेखाना देऊळ दिसले. दोन हत्तीची सोंड देवीच्या डोक्यावर एवढेच काय ते दिसत होते, बाकी दगडी मूर्ती काळाच्या ओघात जीर्ण झाली होती हे वस्त्राआडून पण कळत होते.
बघता बघता आमची अक्षी गावातली पाच एकापेक्षा एक निराळी देऊळे बघून झाली. अक्षी मधली जुनी घरे, जुना वसा, अक्षीची वेगळी ओळख लक्षात आली. आणि निलेशने चहाची तल्लफ लागली. अक्षीसारख्या छोट्या गावात चहाची टपरी वगैरे काही नसतं. अलिबाग पोहोचेपर्यंत एखादे हॉटेलही नजरेस पडत नाही असा हा परिसर, मग इथे आता चहा मिळणार कुठून? पण इच्छा तिथे मार्ग या तत्वानुसार निलेशने समोरच असलेल्या शिर्के रिसॉर्ट बाहेर उभे असलेल्या माणसांना विचारून बघितले आणि तिथेच शिर्के रिसॉर्ट मध्येच आमची चहाची सोया झाली.
कुल्हड मध्ये दिलेला चहा पिऊन आम्ही माघारी फिरलो. आता अंधारही पडायला लागला होता. परत येत असताना अचानक लक्ष्मी-नारायण मंदिराचे जोशी वाटेत उभे, "काय, बघितली का आणखी देऊळे? आणि ते काळंबा देवीचे देऊळही बघितले का? ती गावाची कुलदेवी!"
अच्छा तर आम्ही कुलदेवीचे दर्शन घेऊन आलो होतो तर. पुढे जोशींनी हे ही सांगितले की बाहेर असलेली गजलक्ष्मी म्हणजे काळंबा देवीची रक्षणकर्ता, म्हणून ती बाहेर आहे, सदैव रक्षण करायण्यासाठी. ही नवीन गोष्ट मनाच्या कोपऱ्यात साठवत आम्ही जोशींचा निरोप घेतला आणि पुढे आलो तर कुत्री परत हजर. या वेळी मात्र आम्ही प्रत्येक कुत्र्याला टोस्ट दिले आणि तीनही कुत्र्यांनी संतुष्टपणे ते संपवले आणि आपापल्या मार्गी गेले.
अशी होती अक्षी गावातली आमची एक अविस्मरणीय संध्याकाळ. भूतकाळात रमवून ठेवणारी, मन प्रसन्न करणारी, नवीन नवीन गोष्टी आमच्या समोर ठेवणारी, कार्यकुशल माणसांना भेटवणारी आणि प्रेमळ कुत्र्यांची आठवण बरोबर पाठवणारी.
ही होती अक्षीच्या
दैवतांची गोष्ट. अक्षी गावच्या दानवांच्या भन्नाट गोष्टी पुढे वाचूयात... लवकरच!
अक्षी गावातील दानवांच्या गोष्टी इथे वाचा
https://bit.ly/3e5t59D



















वा सुँदर फोटो आहेत. छान वाटले वाचताना . छोट्या ओमचे विशेष कौतुक
ReplyDelete