अक्षी गावच्या दानवांच्या भन्नाट गोष्टी
अक्षी गावातील देवांच्या गोष्टी इथे वाचा
https://bit.ly/3tUnJUP
आणि आता पुढे, बॅक टू दानव...
रविवार, २१ मार्च २०२१
अलिबाग मधील अक्षी गावात माझा तिसरा दिवस होता. आज चेक आऊट करायचे, कुलाबा किल्ल्यावर जायचे आणि तेथून दुपारी जेवणावर ताव मारून तडक नवी मुंबईला निघायचे असा बेत ठरला होता. आदल्या दिवशी कनकेश्वरच्या ६५०+६५०=१३०० पायऱ्या चढून उतरून सर केल्यामुळे सगळे जरा दमले होते. त्यात परत भारत-इंग्लंड टी-२० मॅच ने रात्र खाल्ली आणि झोपायलाही ११.३० वाजले.
त्यामुळे सकाळी मी एकटाच लवकर उठलो, पटापट आवरले आणि खाली भटकायला बाहेर पडलो. हॉटेलच्या बाजूलाच एक तलाव बघितला होता. त्याचा मत्स्यपालन करण्यासाठी उपयोग करत होते असे समजले. म्हटलं आज सकाळी परत त्या तलावाला भेट देऊ, काठावरचे पक्षी बघू आणि वाटलं तर अक्षी बीच वर एक चक्कर मारून परत येऊ.
हॉटेलच्या मोठ्या गेटच्या बाहेर आलो आणि तलावाकडे चालू लागलो तर असे लक्षात आले की माझ्याबरोबर अजून एक इसम चालत आहे. मी त्याच्याकडे बघितले तर तो गावातलाच कोणीतरी दिसत होता. तो मी त्याच्याकडे बघण्याची वाटच बघत होता. त्याने लगेच मला वेळ विचारली आणि मी सांगितली. तेव्हाच मला देशी दारूचा वास आला. मी मनात म्हटलं की सकाळी सकाळीच हा टाकून आला आहे. पण त्याची चाल तर सरळ होती.
निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि हाफ चड्डी असा त्याचा पेहराव. त्याच्या हातात एक छोटी बादली होती ज्यात प्लॅस्टिकची पिशवी कोंबली होती आणि त्यावर एक प्लास्टिकचा ग्लास वाकडा पडला होता. पण त्याने ज्या प्रकारे बादली पकडली होती त्यावरून कळत होते की बादलीत जे काही आहे ते जड आहे, पण काय ते काही दिसत नव्हते की कळत नव्हते. तलावाच्या अगदी अलीकडे एक उंच पाण्याची टाकी लागते, आणि त्या टाकीच्या अलीकडे प्लास्टिक बाटल्या आणि इतर कचरा यांचा संमिश्र ढीग पसरला होता. तिथे पोहोचताच तो माणूस त्या ढिगात शिरला आणि बदली उलटी केली. त्याच क्षणी एक तीव्र, उग्र दर्प माझ्या नाकात शिरला आणि माझ्या पायांनी आपसूक मला त्या जागेपासून सहा पाऊले लांब नेले. बदली उलटी केली तेव्हा मला कळाले की त्यात मलमूत्र होते आणि त्या माणसाने ते कचरा फेकू त्या सहजतेने त्या प्लॅस्टिकच्या ढिगात ते मलमूत्र फेकले होते.
ते फेकून होताच त्याने बदली तेथेच ठेवली आणि सहा पाऊले चालून मी उभा होतो तिथे येऊन ठेपला. हलका देशी दारूचा वास सोडला तर त्याला अन्य कोणता दर्प येत नव्हता हे माझे नशीब. येऊन तो स्वतःच माझ्याशी बोलू लागला.
"तुम्ही राहता तिकडे माझी बहीण काम करते. मी इथेच राहतो", बोलणे तरी स्वच्छ आणि स्पष्ट होते. मी मान डोलावली आणि तलावाकडे बघू लागलो.
"या तलावात मोठे
मासे आहेत. तो चालवायला घेतला आहे. हे बघा, हे बघा."
बघतो तर एका मोठ्या माशाने पाण्यावर उडी मारली
होती आणि क्षणात तो पाण्याखाली नाहीसा झाला.
![]() |
| जरी हिरवं शेवाळं साठलं होतं तरी तलाव होता सुंदर |
"पावसाळ्यात हा तलाव
पूर्ण भरतो आणि वाहतो. दोन फूट पाणी इथे येते आणि गावात पण सगळीकडे पाणी येतं." मी आश्चर्यचकित. तो चालूच.
"त्या वर्षी
पाण्याबरोबर सगळे मासेही बाहेर आले, गावभर पसरले. सगळं वाहून गेलं त्याचं."
मी विचारलं, "त्याचं म्हणजे कोणाचं?"
"तो कोळी आहे,
गावातलाच. त्याने हे तळं चालवायला घेतलंय.
बरोबर एक भैय्या पण आहे."
मी विचारलं, "किती रुपये घेतात चालवायचे?"
तो, "घेतात एक १५-२० हजार रुपये. पण हे मासे मोठे आहेत. मोठ्या हॉटेलने विकले जातात आणि चांगला पैसे मिळतो, ५० हजार!"
तळ्यावर शेवाळ्याचा हिरवा तवंग पसरला होता. मी त्याबद्दल विचारायचा अवकाश की तो परत सुरु झाला, "हे इथले लोक घाण टाकतात तलावात म्हणून हे पाणी घाण होतं."
तलावाच्या दुसऱ्या काठावर घरे दिसत होती. मुंबईत जसं नदीच्या बाजूने झोपडपट्ट्या असतात आणि सगळं कचरा ते नद्यांत रिकामा करतात तसाच हा प्रकार होता.
"तुम्हाला सांगतो हे
पाणी एवढं स्वच्छ आहे की नुसता डोळ्याने पाण्यातले मासे दिसतात. पण या माणसांनी हे
पाणी घाण करून टाकलं आहे. आत ऊन पडला की हे हिरवं सगळं लाल होईल. मध्ये हे शेवाळं
काढतात की हो."
मी विचारलं कसं काढतात तर उत्तर मिळाले, "ते असा गोल जाळी असते. बोटीत बसून त्या जाळीत शेवाळ काढतात. तो कोळीचा
बरोबर काढतो. एकदा काय झालं, या
माणसांनी (परत पलीकडच्या काठावरच्या वस्तीकडे बोट दाखवत तो म्हणाला) तलावातले मासे
पळवले आणि बाजूला त्यांच्या विहिरीत सोडले. पण तो कोळी पण हुशार. रात्री २ वाजता
तो भैय्याला घेऊन आला. विहिरीकडे टॉर्च मारली आणि तेवढ्यात काही मुले विहिरीच्या
बाजूने निसटताना त्याला दिसली. त्याला शंका आली.
लगेच तो विहिरीकडे गेला आणि विहिरीत टॉर्च मारली तर त्याचे मासे इकडे. मग त्याने
भैय्याला टॉर्च पकडायला सांगितली आणि स्वतः विहिरीत उतरून सगळे मासे बाहेर काढून
परत तलावात सोडले. असली माणसं आहेत ही."
त्याने तलावापलीकडच्या घरांकडे बोट दाखवून त्यांच्यावर थेट आरोप केले.
त्याच्या बोलण्यावरून जाणवत होते की ही तलावाकाठची माणसे अक्षी मधलीच आहेत पण अक्षीत नाहीत! दोघांमधली फळी साफ जाणवत होती. मी अक्षी बीच वरच्या घाणीचा विषय काढला आणि अक्षीचा एक नवीन पैलू त्याने उलगडला,
"हे डॉक्टर आहेत ना,
इथे पुढे त्यांचा बांगला आहे."
काल बीचवर जाताना आम्ही पुढे दोन-चार छान बंगले बघितले होते. तिथे होळीच्या शिमग्याची तयारी चालू होती. काही मुले आणि मुली रस्त्यावर एक सरळ रेष आखात होते आणि त्या रेशीला तोंड होते. हा होता साप. आणि त्याच्या टोकाला एक केळीचे झाड उभे केले होते, ते ही भर रस्त्यात. यावरून निलेशना कळले की ही तयारी होळीकरता चालू आहे.
![]() |
| सापाचे तोंड आणि ती सरळ रेष म्हणजे साप. आणि दुसऱ्या टोकाला दिसत आहे ते रस्त्याच्या मध्यभागी लावलेले केळीचे झाड! |
"
![]() |
| बघा कसं मध्येच उभं आहे केळीचे झाड |
तर या डॉक्टरने मागच्या वर्षी सगळ्यांना सांगितलं होतं की आपण बीच साफ करू म्हणून. त्यांनी लाऊड स्पीकरवर अख्या अक्षी गावात सांगितलं की संघ्याकाळी सगळे बीच वर जमा आणि आपण साफ सफाई करू. संध्याकाळ झाली पण कोणीही गेले नाही."
त्याचेच फळ की अक्षी बीचवर एवढी घाण आहे, प्लास्टिक आहे आणि त्यामुळे पर्यटक कमी फिरकतात. सगळे नागाव कडे जातात.
तेवढ्यात त्याने समोर दिसत असलेल्या फाटक्या साडयांकडे बोट दाखवले.
"अहो काय
सांगू. अख्या तलावाभोवती काठ्या लावून त्याला चांगल्या साड्या लावून पडदा तयार
केला होता. ही गावातली पोरं खूप उनाड आहेत. रात्री इथे टाकीच्या इथे अंधारात चरस
पीत बसतात. त्यातल्याच कोणीतरी आग लावून दिली आणि
सगळ्या साड्या जाळून गेल्या. इथून तिथपर्यंत हिरवी जाळी होती, तीही जळून गेली. ही गावातली पोरं खूप उनाड
हो."
याला कोणी आग लावली
ते माहीत होत, पण तो नाव घ्यायला तयार नव्हता.
बोलता बोलता आम्ही
सहा पाऊले मागे टाकीपाशी आलो होतो. टाकीच्या खाली एक बंद खोली दिसत होती. त्याकडे
बोट दाखवत तो म्हणाला, "ही
वर मोठी टाकी आहे ना तेवढीच मोठी टाकी खाली जमिनीत पण आहे. इथून पाणी वर चढवतात
आणि मग गावात सोडलं जातं. २ दिवस गावात पाणी येतं."
“म्हणजे आठवड्यातून २च दिवस नळाला पाणी येतं,
आणि मग इतर दिवस काय करता?” मी प्रश्न केला.
"अहो २ दिवस या
वाडीत येत, मग २ दिवस पुढच्या
वाडीत असं करत करत मिळतं पाणी. मग काय
ड्रम मध्ये भरून
ठेवायचं आणि बाकी दिवस वापरायचं."
वाहत्या झऱ्यात आपण
नुसतं भांडं धरलं तर एका क्षणात ते पाण्याने जितक्या सहजतेने भरून जाते तशा सहजपणे
त्याने ही पाण्याची व्यथा सांगितली होती. पाण्याविषयीचे हे भीषण वास्तव सांगून झाले न झाले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरले,
"या गावची पोरं अशी आहेत ना, या टाकीवर जाऊन संडास करतात." मी त्याच्याकडे बघताच राहिलो. शोले मध्ये टाकीवर चढून धर्मेंद्रचे
डायलॉग अजूनही अतरंगी वाटतात पण टाकीवर जाऊन संडास! हा तर विक्षिप्तपणाचा कळसच!
बर, हे
प्रकरण इथेच संपत नाही बरं का, अक्षी काय चीज आहे ते अजून समोर यायचं
आहे.
तो टाकीवरची संडास
अशा हावभावात सांगत होता जसं की अक्षीकरांनी कोणते मोठे गर्वाचे काम केले आहे.
त्याने चालूच ठेवले, "ही मुलं चरस पितात आणि काही पण करतात. एकदा तर
त्यांनी टाकीचं झाकण उघडला आणि टाकीत
संडास केली!"
हे ऐकल्यावर
तर माझी तोंडात बोटे घालायचं तेवढं राहिलं
होतं.
त्याच्या भावाने
पाण्यातली घाण कशी काढली ते दाखवण्यासाठी दोन्ही हात जोडून काहीतरी सांडू नये म्हणून
सांभाळून उचलतोय अशी क्रिया त्याने करून दाखवली.
आणि तेव्हा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली आणि कळाले की याच्या तोंडाला देशी दारूचा वास का येत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याने मलमूत्राने भरलेली बादली रिकामी केली होती आणि असे करायला नुसते शुद्धीत असून चालत नाही, नाहीतर लवकरच शुद्ध हरपली जाईल. त्यासाठी मती गुंग करून, इंद्रिये तात्पुरती निकामी करूनच हे काम करावे लागते. मुंबईत आणि देशभरात आपण वाचतोच की कसे कर्मचारी गटारात उतरून ते साफ करतात, आणि न वाचता हे कानावर येतच की कसे त्यांना प्यावे लागते, त्याशिवाय गटारात उतरताच येत नाही.
धन्य ते अक्षीकर, एकाच गावात एवढे अद्वितीय दैत्य आणि त्यांचा काळजीने सांभाळ करणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला उपद्रव करणारे असे विक्षिप्त, व्यसनी दानव. या दोघांना आपल्या कुवेत घेऊन कसे हे अक्षीकर निवांतपणे कारभार चालवत आहेत.
बाय बाय अक्षी, दोन दिवसांची ही सहल अविस्मरणीय केल्याबद्दल धन्यवाद!
- धवल रामतीर्थकर



खूप छान लिहिलंय
ReplyDeleteवा मस्त
ReplyDelete