यावा कोकण आपलाच असो (जोपर्यंत महापुरुष तुमचा रक्षणकर्ता असो)

 नशीबाने माझ्या सासुरवाडीचे गुगल लोकेशन कोकणात येते. लग्न झाल्यापासून मोजून किंवा वेळा मी सासुरवाडीला गेलो असेन. तसे पोयरे गाव ही लगेच पोहोचता येईल असे नाही. सकाळ सकाळच्या जनशताब्दी एक्सप्रेसने कितीही लवकर कणकवलीला पोचवलं तरी तिथून पुढे पुलाखालून भाड्याची टमटम पकडून आचरा तिठा गाठेपर्यंत पाऊण - एक तास जातो. मग तिथून प्रायव्हेट रिक्षा ठरवायची आणि दोन्ही बाजूला गर्द झाडीने व्यापलेला दोन एक किलोमीटर रस्ता पार करून पोयरे गाव जवळ करायचे. मुख्य रस्त्यापासून उजवीकडे झाडीत लुप्त होणारा, दगड धोंड्यांचा उतरता रस्ता दिसला की रिक्षावाल्याला विनवणी करून दगडांवरून रिक्षा खाली थेट अण्णांच्या घरासमोर (आमचे सासरे पांडुरंग नाडकर्णी यांना गावात सगळे अण्णा म्हणूनच ओळखतात) थांबवायची.

आमचे स्वागत करायला आणि रिक्षावाल्याशी मालवणीत बोलायला माझे ८२ वर्षीय सासरे चुकता दारात हजर असणार हे आतापर्यंतचे ठरलेले. याही वेळेला ते हजर होते, नको नको म्हणत असताना आमच्या हातातून बॅग हिसकावून घेत ते पुढे चालायला लागले सुद्धा. आम्ही आपले धापा टाकत, बॅग सांभाळत घराच्या अंगणात विसावलो. तसे माझे नशीब इथेही बलवत्तर, कारण सासुरवाडीचे हे घर म्हणजे जणू स्वप्नातले घरचं, एक कौलारू स्वप्न. लोखंडी गेट मधून आत शिरताच दोन्ही बाजूला झाडे डौलाने उभी. त्यांच्या मधून एक निमुळती पाऊलवाट घरासमोरच्या ऐसपैस खळ्यात नेऊन पोचवते. (खळं म्हणजेच अंगण हे मलाही आताच उमजलं) तर या प्रशस्त खळ्यात एक सुंदर तुळशी वृंदावन उभे आहे. त्या वृंदावनाला छानसा चौथाराही आहे

प्रशस्त आंगण आणि तुळशीवृंदावन

तीन पायऱ्या चढून गेलो की वृंदावन समोर, आणि वृंदावनाच्या समोरच्याच बाजूला, खाली एक चेहरा स्पष्ट कोरलेला आढळतो. तो आहे कृष्ण, तुळशीचा सोबती. आधी मला हा चेहरा म्हणजे कोकणात गावागावात घराचे, शेताचे, वाडीचे, माडीचे, कुळाचे रक्षण करणारा महापुरुष आहे असेच वाटायचे. कारण महापुरुषा बद्दल गोष्टीही तेवढ्याच ऐकलेल्या.

तुळशी वृन्दावनावर कोरलेला हा चेहरा मला महापुरुषाचाच आहे असे वाटायचे. पण हा आहे कृष्ण!


 नाडकर्णी कुळाचा रक्षणकर्ता - महापुरुष

चार एक वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा एका काळोख्या रात्री आम्ही घराच्या पडवीत असेच बसलो होतो. कुठून विषय निघाला आणि बाबांनी (अण्णा आणि माझे सासरे) महापुरुषांविषयीची एक हकीकत सांगितली. एकदा काकांचा (त्यांच्या छोट्या भावाचा) पॉमेरिअन कुत्राही कोकण सैर करायला पोयरेच्या घरी पोचला. वास्तविक पॉमेरिअन कुत्री नाजूक आणि घरात राहणारी जात. एका मध्यरात्री हा कुत्रा कसा कुणास ठाऊक घरातून बाहेर पडला आणि घराच्या मागच्या बाजूला गेला. सकाळी सगळे उठले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला! असं आढळलं की कुत्र्याचा एक डोळा त्या रात्रीत निकामी झाला होता. बाबांचं म्हणणं आहे की रात्री तो कुत्रा बाहेर गेला असताना महापुरुष घराभोवती पहारा देत होता. पहारा देत असताना हा कुत्रा मध्ये आला आणि नशीबाने एका डोळ्याच्या बदल्यात त्या महापुरुषाच्या कहरातून वाचला. बहुदा कुत्रेच वाचू शकतात, माणसांची तर धडगतच नाही. का म्हणता? लवकरच समजेल!

ही झाली मागच्या खेपेची गोष्ट. या वेळी तर महापुरुषाने पोयरे गाजवले असे समजले.

झाले असे की घराच्या बाजूला असलेली आमची आवडती विहीर बघायला गेलो होतो. तेव्हा बाजूच्या रिकाम्या जमिनीच्या तुकड्याकडे बोट दाखवत माझे साडू निलेश म्हणाले, "हे बघ इथूनच आम्ही पलीकडे महापुरुषाच्या दर्शन घ्यायला जायचो" पलीकडे बघितले तर नुसते मोकळे रान आणि मोठाला जमिनीचा तुकडा. महापुरुष कुठे दिसेनात.

त्याच रात्री घरात गप्पा चालू होत्या आणि बोलता बोलता अण्णा (बाबा) म्हणाले की मागे कधी बाजूच्या जमिनीचा तुकडा घेणार का म्हणून जमीन मालकाने विचारलं होतं. पण आताच आहे तेवढा घराचा परिसर पुष्कळ मोठा आहे आणि पुरेसा आहे. अजून एवढी मोठी जमीन घेऊन ती सांभाळणार तरी कशी? नाडकर्णीच घेणार नाहीत तर कसे होणार? पुढे बरीच वर्षे हा जमिनीचा तुकडा तसाच राहिला.

पडवीतील गप्पा मारायचे ठिकाण

पण नियतीची चक्रे अशी काही फिरतात की भल्या भल्यांना त्याने होणाऱ्या परिणामाची कुणूक देखील जाणवत नाही. वाट बघून बघून शेवटी बाजूच्या जमीन मालकाने अगदी हल्लीच ती जमीन, नाडकर्ण्यांच्या महापुरुषाच्या स्थानासकट कोणाला तरी विकली असे समजले आहे.

महापुरुष हा विषय येताच अण्णा त्वेषाने सांगू लागले, "तो नाडकरण्यांचा महापुरुष आहे, दुसऱ्या कोणाला टिकू देणार नाही. आता वाड्याचंच बघा. (नाडकर्णी वाडा ही भली मोठी वास्तू कधी काळी गावात होती असं मी बरेच वेळा पप्पा काकांकडून ऐकलं होतं.) आमचा वाडा कोणा कोळ्याने विकत घेतला. तो कोळी म्हणजे मोठे बस्तान होते. त्याच ४-५ गलबतं होती आणि एकूण बऱ्यापैकी चांगलं चालू होतं. पण नाडकर्णी वाडा घेतला आणि दिवस फिरले. धंदा पूर्ण बसला. गलबतं विकावी लागली आणि त्याची परिस्थिती एवढी हालाकीची झाली की हौशेने घेतलेले नाडकर्णी वाडाही त्याला विकावा लागला. होत्याचं नव्हतं झालं!

त्या कोळ्याने तो वाडा विकला खरा पण शेवटी होता तो नाडकरण्यांचाच वाडा. तो दुसऱ्या कोणाला कसा लाभणार? नवीन मालकाने घेतला खरा पण वाडा घेण्याची ऐपत असलेल्या या इसमाची किस्मत वाडा घेल्यापासून फिरली ती परत आलीच नाही. कोणत्या मोठ्या आजाराने त्याला पछाडले आणि त्याने अंथरूण धरले ते कायमचेच. आजारपण काढण्यात पूर्ण मिळकत कामी आली.

गावात असताना मी सकाळी सकाळी नदीकाठी चक्कर मारायला गेलो होतो. परत येताना मनात आले की हा गजब नाडकर्णी बघून जावे. भल्यामोठ्या गेट मधून आत गेलो तर समोर मोकळा परिसर. डाव्या बाजूला एक छोटे, दोन मजली घर (घर पण नाही म्हणू शकणार त्या वास्तूला) उभे होते. आजूबाजूला बघितले तर आता त्या वाड्याची कोणती खूणही नाही. परिसर एकदम सामसूम, आणि उदास.

आजच्या घडीला नावाने किंवा सात बारा प्रमाणे ती जमीन नाडकर्णी यांची नसेल पण नाडकर्ण्यांच्या महापुरुषाचा पहारा त्या वाड्याच्या वास्तूवर अजूनही तसाच आहे असेच म्हणावे लागेल!

हा दगडी चौथरा  दिसत आहे ना, ते आहे पोयरे गावातील नाडकर्णी घराला लागून असलेल्या मोकळ्या प्लॉट मधले महापुरुषाचे ठिकाण


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

फासे पारध्यांची गोडी

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने