सुरांशी भेट

२६ जानेवारी २०२३. गुरुवार होता आणि आम्ही, म्हणजे शीतल, ओम आणि मी, असे तिघे दुपारी ४ वाजताच्या पनवेल नांदेड एक्सप्रेस ने पुण्याला निघालो होतो. ऐनवेळी ठरल्यामुळे तात्काळ तिकीट काढावे लागलेले आणि २६ जानेवारी लागून चार दिवस  सुट्टीचा वीकएंड असल्याकारणाने गाडीने जायचे टाळले होते.

आमच्या बाजूच्या सीटवर साठीतील एक काका-काकू आसनस्थ होते. डोळ्यात भरणारी आणि चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे काकांचा पेहराव. घरंदाज लोक घालतील तसा मोती रंगाचा कुरता, पायजमा आणि त्यावर एक बिनबाहींचे समारंभात घालतात तसे जाकीट. बसल्यापासून दोघांचे चेहेरे गंभीर, आमच्याशी सोडा पण एकमेकांशीही जास्त बोलणे नाही, एकूण रंग बघून माझा प्रथमदर्शनी असा समज झाला की काका तालेवार घराण्यातले, शिष्ट आणि तऱ्हेवाईक इसम  आहेत आणि काकू त्यांच्या स्वभावामुळे आणि दडपणाखाली शांत बसून आहेत.

काही वेळातच माझा समज खंडाळ्याच्या घाटातून खाली कोलांट्याउड्या मारत नष्ट होणार होता, कसा ते पाहाच. काय झाले कोणास ठाऊक दोघांनी अचानक झोपायचे ठरवले आणि समोरचा मधला बर्थ तयार केला. ओमनेही बाल्कनी सीट पकडली होती, शीतलही झोपण्यासाठी वरच्या बाल्कनी सीटवर गेली आणि मी शांतपणे पुस्तकात रमून गेलो. तासाभरात काका उठले. पाठोपाठ शीतलही उठली  काकूही उठलेल्या दिसत होत्या पण सीटवर झोपूनच होत्या. झोप झाल्यावर काका जरा ताजेतवाने वाटत होते आणि शीतल तर सकाळी उठल्यासारखी खाली येऊन बसली.

सेल्समध्ये असल्यामुळे शीतलने काकांशी या ना त्या कारणाने बोलणे सुरु केले. काकाही आता बोलायला लागले होते. मधून मधून काकूही झोपूनच एखादे वाक्य बोलत. शीतललाही त्यांच्या शाही पेहरावाचे आश्चर्य वाटत होते आणि तिने काकांना ते सांगितले की किती त्यांचा रुबाब आणि टापटीप वेशा तिला आवडला. आणि तेव्हा आमची सुरांशी भेट झाली!

काकांनी खुलासा केला की ते सनईवादक आहेत आणि तो बाज अंगात मुरला आहे आणि त्यामुळे ते कायम अशाच पेहरावात असतात. समोरच्या सीटखाली असलेल्या लांबट आकाराच्या बॅगकडे बोट दाखवून त्यात त्यांची सनई असल्याचे सांगितले. रुबाबदार पेहरावानंतर हे आमच्यासाठी दुसरे आश्चर्य होते. शीतलला गाण्याची आवड असल्यामुळे तीही उत्साहात बोलू लागली. काका फक्त सनई वादकच नव्हते तर पंडित शैलेश भागवत होते, ज्यांनी स्वर्गीय भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान सारख्या दिग्गज कलाकाराकडून सनईची दीक्षा घेली होती.  वीसहून जास्त वर्ष त्यांचे शिष्य तर होतेच पण सनईवादकांमध्ये उस्ताद बिस्मिल्लाह खानाची परंपरा राखणारे प्रमुख आणि एकमेव वादकही होते. बोलता बोलता शीतलची आणि त्यांची नाळ जुळली, कारण ते ही GSB होते आणि शीतलही. दुसऱ्या क्षणी दोघे मनाने गोवा मध्ये जाऊन पोचलेही. गम्मत अशी की समोरच्या मधल्या सीटवर दुसरे कोणी येऊन झोपले म्हणून काकूंना उठून बसता येईना. म्हणून त्या झोपूनच राहिल्या आणि तशाच आमच्याशी गप्पा सुरु झाल्या.

एव्हाने पुणे स्टेशन जवळ आले होते आणि सामानाची आवराआवर करताना काकांनी आवर्जून सांगितलं की ४ फेब्रुवारीला त्यांचा मुंबईला सनई वादनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा शो नेहरू सेन्टरमध्ये होणार आहे. त्याला यायचे आग्रहाने निमंत्रण दिले. मला आणि शीतललाही एवढ्या दिग्गज कलाकाराला भेटून आनंद झाला आणि ४ फेब्रुवारीला काकांचा शो चूकवायचा नाही असे मनोमन ठरवले.     

भागवत काकांनी लांबट बॅगेमधली त्यांची सनई दाखवली



गप्पांना रंग भरला


 


सुरांची मेजवानी

बघता बघता ३ फेब्रुवारी समोर येऊन ठेपली आणि भागवत काकांचे ४ तारखेला होणाऱ्या शो चे whatsapp आमंत्रण आले. अमेरिकेचे सेक्सओफोन वाजवणारे फील स्कार्फ यांच्याबरोबर जुगलबंदी होती आणि तबल्यावर झाकीर हुसेन यांचे शिष्य भूषण परचुरे असणार होते. सुरांशी भेट तर आधीच झाली होती. आता समोर वाढलेली सुरांची मेजवानी कोण चुकवणार!
वरळी मधल्या नेहरू सेंटर हार्मोनी हॉलमध्ये कार्यक्रमाला आम्ही पोचलो आणि भागवत काकांनी अगदी पहिल्या रांगेत बसण्याचा आग्रह धरला. पुढचा दीड तास ५-७ फुटांच्या अंतरावरून आम्ही सनई, तबला आणि सॅक्सओफोनच्या अभिजात सुरांमध्ये न्हाऊन निघालो.

इतक्या जवळून बघत असल्यामुळे सनई वाद्य कसे असते, त्याची रचना किती नाजूक असते ते कळाले. पंडित शैलेश काका भागवत यांचे कसब, कला, शिस्त यांचे दर्शन झाले. सनईवरील हातांच्या नाजूक हालचाली, फुंकून स्वरांना खेळवण्याची त्यांची कला तर वारंवार वाहवाह मिळवत होती. तीन वर्षांनी प्रथमच ते शो करत होते आणि जसा जसा शो पुढे गेला तसं तसं शेहनाईचे अनेक नाजूक पदर त्यांनी हळुवारपणे आमच्यासमोर उलगडून ठेवले. त्यांना सेक्सओफोन वर पुण्यातून उत्तर घराण्याचे विधिवत संगीत शिक्षण घेतलेल्या फील स्कार्फ यांनी आणि उस्ताद झाकीर हुसेन शिष्य तबलावादक भूषण परचुरे यांनी उत्तम साथ दिली. ओम तर तबल्यावर विद्युतवेगाने सूर आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या भूषणजींच्या कलेने मंत्रमुगध होऊन गेला.

सुरांची जादू गुंफताना पंडित शैलेश काका भागवत

उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य भूषण परचुरे

    सेक्सओफोन वर सनईचे सूर साकारणारे फील स्कार्फ

हा सुरेल नजराणा चालू असताना मध्यांतर मध्ये पंडितजी त्यांच्या परिचयाचे प्रसिद्ध संतूर वादक पंडित स्नेहलजी यांना विचारत होते की आता काय वाजवू? कोणता राग घेऊ? आणि प्रेक्षकांपैकी मागील खुर्च्यांवरील एका श्रोत्याने फर्माईश केली, "राग मालकंस लिजिए पंडितजी". यावर शैलेशजींनी एक करारी नजर मागे टाकली आणि दुसऱ्याच क्षणी हसून पण हताशपणे म्हणाले, "हमने यह राग गिरवी रख दिया है.लगेचच त्यांनी या गिरवी ठेवणाचा खुलासा केला, आज कल लोग ऐसे समझने लगे है की शेहनाई मतलब सिर्फ राग मलकंस ही होता है, और कुछ नही होता." पुढे मिश्कीलपणे हसत पण ठामपणे त्यांने हे प्रकरण तिथेच संपवलं, "इसलिये, जब राग मालकंस को छुडाके लायेंगे तब बजायेंगे."

आणि मला हल्लीच वाचलेल्या पंडित भीमसेन जोशींच्या मुलाने त्यांच्यावर लिहिलेले पुस्तक 'गणरायाचे पोर' त्यातल्या एका गोष्टीची आठवण झाली. त्यात एक आठवण राघवेंद्रजीं (त्यांचा मुलगा) अशी सांगतात की ज्या कमी क्षणी पंडितजी त्यांच्याबरोबर असत तेव्हा ते राघवेंद्रला विचारत की तुझा आवडता राग कोणता? यावर राघवेंद्रचं उत्तर ठरलेलं असे, राग मलकंस. मग हळूच पंडितजी तो राग गायला सुरु करत आणि राघवेंद्रजी तो राग आपल्या मनात साठवून ठेवत. 

या राग मलकंसचा शेवट केल्यावर शेवटी एक हुकमी एक्का बाहेर काढायचं ठरलं, राग भैरवी! आणि ती शेवटची २०-२५ मिनिटे ही सुरांची सफर एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचली. सनईवर पंडित शैलेश भागवत, सॅक्सओफोन वर फील स्कार्फ आणि तबल्यावर भूषण परचुरे यांचे सूर असे काही एकमेकात आणि माझ्या हृदयात विलीन झाले की आपण एका अभिजात कलाकृतीचे साक्षीदार आहोत याची जाणीव झाली.

योगायोग म्हणा किंवा शीतल म्हणते तसे स्वामींच्या इच्छेने म्हणा, आम्हाला पंडित शैलेश भागवत यांसारख्या सनई दिग्गजांचे वदन ऐकायला, बघायला आणि अनुभवायला मिळाले. शैलेशजींनीच म्हटल्याप्रमाणे सनईवादन कला आता लुप्त होत आहे आणि काही वर्षात ती endangered या श्रेणीत येऊन लुप्त होणार.

त्याआधी आम्हाला इतक्या जवळून याचा अनुभव घेण्याचे नशीबात होते आणि पंडितजींच्या इच्छेने ते साकारही झाले.

ही स्वर्गीय सुरांशी झालेली ओळख कायम राहते की काळात विरून जाते ते तोच जाणे... 

- धवल रामतीर्थकर

सुरांच्या मेजवानीस भागवत काकांबरोबर एक क्षण

शीतल आणि ओम सह, सहपरिवार 


Comments

Popular posts from this blog

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

फासे पारध्यांची गोडी

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने