भविष्यातील भूतकाळ
मानवी मन हा निसर्गाचा चमत्कार आहे. माझे मन ही असेच आहे, सूर्य देवतेचे सात घोडे जुंपल्याप्रमाणे! हे सात घोडे सतत मनाला चहूदिशेने दौडत नेत असतात आणि मनही आनंदाने त्यांच्याबरोबर बागडत असते... आणि असेच भरधाव मेंदूच्या असंख्य कक्षेतून आणि छुप्या कप्प्यांमधून बागडताना आपोआप मनाचा एक असा कप्पा उघडला जातो की आपल्याला एक वेगळाच साक्षात्कार होतो.
हल्ली मी
रोज सकाळी व्यंकटेश स्तोत्र वाचन करतो. वाचून झाल्यावर मुखपृष्ठावर असलेले श्री विष्णूंचे
मनोहारी रूप डोळे आणि मन भरून बघतो. हा नित्याचा क्रम झाला आहे. असेच एके दिवशी व्यंकटेश
स्तोत्र वाचून झाले आणि मुखपुष्टावर नजर खिळली, आणि तेवढ्यात घोड्यांनी मनाच्या एका
अज्ञात कप्प्यात प्रवेश केला. मनाने नजरेशी समन्वय साधला. श्री विष्णूंच्या हातात असलेला
शंख, चक्र आणि गदा ही निव्वळ प्रतीके नसून श्स्त्रे आहेत याचा प्रत्यय झाला. पण या
विचाराला एक वेगळीच धार होती, एक रोमांचक किनार होता. कारण तो विचार भूतकाळ, वर्तमानकाळ
आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांमध्ये वावरत होता.
तसा हा विचार
वेगळ्या अवतारात बऱ्याच वर्षांपूर्वी डोक्यात प्रकट झाला होता. थोडक्यात सांगायचे झाले
तर, जी प्रगती, जे वैज्ञानिक शोध मानवजात आज लावत आहे ते हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात
होती आणि याचे प्रमाण म्हणजे अशोक स्तंभ, राम सेतू, पुष्पक विमान, पिरॅमिड वगैरे अशा
अनेक वास्तू ज्याचे उत्तर वैज्ञानिक दृष्टीने प्रगत आजच्या पिढीकडे देखील नाही. तर
श्री विष्णूनींची आदिशेष नागावर विराजलेली मूर्ती पाहिल्यावर याच विचारांची सुधारित आवृत्ती
डोक्यात एकदम चमकली.
विचार - सुधारित
आवृत्ती:
श्री विष्णूंकडे
नीट पहा. त्यांच्या डाव्या हातात शंख आहे, तर उजव्या बोटात चक्र आणि उजव्या हातात गदा
खाली विसावलेली दिसते. आता यात नवीन ते काय? वर्षोनुवर्षे आपण असेच श्री विष्णू तर
पाहत आलो आहे. पण आजच्या प्रगत शस्त्रांस्त्रांकडे बघितलं तर लक्षात येईल की श्री विष्णूंच्या
हातात जी अस्त्रे मानवजातीने दाखवली आहेत ती आजच्या वर्तमानकाळातील अस्त्रांची अति
प्रगत आवृत्ती असू शकते. कसे ते आपण पाहू...
शंख
माझ्या वाचनात
आलेला शंख अस्त्राचा उपयोग तो असा. (कदाचित एस एल भैरप्पा यांच्या 'पर्व' या महाभारतावरील
पुस्तकात वर्णन असेल) श्री विष्णू अवतार कृष्ण यांच्याकडेही चक्र आणि शंख होता. तर
हा प्रसंग डोळ्यांसमोर आणा. श्रीकृष्णाचे मनोहरी रूप युद्धभूमीवर आपल्यता रथात उभे
आहे. हातात शंख धरला आहे. ते शंख उचलून तोंडाला लावतात आणि बेंबीच्या देठापासून शंखध्वनी
करतात. त्याच्या ध्वनीलाहीरी एवढ्या भीषण असतात की त्या लहिरी दीड दोन मैल, समोरच्या
शत्रू सैन्यात घुसून युध्यासाठी ठाकलेल्या, आतुर, भयभीत सैनिकांचा मेंदू निकामी करतात
व क्षणात प्राण घेतात. म्हणजे युद्धात शत्रूशी दोन हात होण्यापूर्वीच हजारो सैनिक यमदासी
पाठवले गेले. या ध्वनीलहिरी म्हणजे नेमकं काय? आजच्या काळात आपण याला कदाचित 'अल्ट्रासोनिक साऊंड व्हेव्हस' या नावाने ओळखतो.
अमेरिका, चीन यासारखे युद्धखोर देश या अल्ट्रासॉनिक व्हेव्हस ध्वनिलाहिरी सोडून आकाशातील विमाने, ड्रोन पाडण्याचा आणि जमिनीवरील सैनिकही नेस्तनाबूत करण्याचा अजून प्रयत्न करत आहेत.
जरा विचार
करा, श्री कृष्णाच्या शंखातल्या ध्वनिलाहिरी आणि अल्ट्रासाउंड व्हेव्हस या एकच नव्हे
काय? म्हणजे हजारो वर्षांपूर्वी श्री कृष्णाकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध होतं आणि त्या
काळात किंवा युगात ते अस्तित्वात होतं तर!
चक्र
विष्णू
अवतार श्री कृष्णाचे सुदर्शन चक्र याची मोहिनी काही औरच आहे. लहानपणी महाभारत कार्यक्रमात नितीश भारद्वाज यांना शिशुपालवर सुदर्शन चक्र सोडून त्याचे मुंडके उडवल्याचे आमच्या पिढीला नक्कीच लक्षात असेल. आता याच चक्राचा जरा खोलात जाऊन विचार करा...
चक्र
हातातून आपल्या लक्ष्याकडे सोडले जात असत, असे आपण मानतो.
आजकाल
ड्रोन हे असेच हातातून
शत्रूच्या हद्दीत सोडले जातात. अमेरिकाने असे ड्रोन विकसित केले आहेत की जे शत्रूच्या
हद्दीत जाऊन त्यांच्यावर छोटी क्षेपणास्त्रे सोडून त्यांचा खातमा करू शकतात आणि परत सुखरूपपणे आपल्या हद्दीत येऊन परत हल्ला करण्यासाठी सज्ज होतात. आता लक्षात आलं की सुदर्शन चक्र
आणि ड्रोन यांच्यामध्ये काय साम्य आहे ते?!
आज
जरी आपण ड्रोन तंत्रज्ञान हे भविष्यातील युद्धाचे
अस्त्रे समजत असलो तरी हे तंत्रज्ञान श्री
कृष्णाच्या युगात अस्तित्वात होतं असे मानायला काही हरकत नसावी.
गदा
गदा
म्हटलं की भीम आणि
भीम म्हटलं की गदा हे
समीकरण हिंदूंच्या डोक्यात तरी पक्के बसले आहे. गदा ही मुळात अत्यंत
जड असे शस्त्र आहे. हे शास्त्र जर
जोरात जमिनीवर आपटले तर जमिनीशी जबरदस्त
घर्षण होऊन जमीन हादरते व क्षणिक भूकंप
झाल्याचा भास होतो. याच अस्त्राने भीम अख्या सैन्याचा चेंदामेंदा करायचा म्हणे.
आजच्या जगात असे कोणते अस्त्र आहे जे अशी असीमित
हानी पोचवू शकते? उत्तर आहे, अणवस्त्रे!
जर
तुम्ही अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा-नागासाकीवर डागलेल्या अणवस्त्राचे व्हिडिओ बघितले असतील तर लक्षात येईल
की ते जमिनीवर पडल्यावर
प्रचंड भूकंप होतो व त्याच्या लहरी
लांबवर जाऊन संपूर्ण परिसर, माणसांसकट, बेचिराख करून टाकतात.
आता कल्पना करा, की धिप्पाड भीमाने प्रहार करण्यासाठी गदा वर उचलली, जणू ती आकाशाला भिडली, आणि एका क्षणात ती प्रहार करण्यासाठी जमिनीवर आदळली. या घर्षणातून ऊर्जाच एवढी जबरदस्त प्रमाणात निर्माण होते की ती आजूबाजूच्या शत्रू सैनिकांना बेचिराख करते. आता लक्षात आले अण्वस्त्र आणि गदा यातले साम्य!
अशीच
अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. जसे की रामायण, महाभारत
काळात अमोघ अस्त्र, किंवा सर्वात संहारकारक ब्रम्हास्त्र यासारखे दिव्य बाण शत्रूवर सोडायचे. हेच बाण म्हणजे आजच्या काळातल्या मिसाईल नाही का? किंवा ज्याला आपण आजच्या काळात बाण मानतो, ते खरं तर
आधीच्या युगात मिसाईल होत्या.
मी
मानतो की जे आपण
अति प्रगत किंवा भविष्यातल्या गोष्टी आहेत असे समजतो त्या खरं तर हजारो वर्षांपूर्वी,
वेगळ्या युगात वापरली जात असणारी अस्त्रेच होती.
गरज आहे ते कल्पनांना मोकळं सोडण्याची, विचारांना चहुबाजूंकडे मुक्तपणे बागडू देण्याची, चौकटीबाहेर, वाचनाबाहेर, जगाबाहेर विचार करण्याची!
काय तुम्ही तयार आहात?
- धवल रामतीर्थकर

Very informative and explained to the point.
ReplyDelete