कोर्टात एक दिवस

नाही नाही, मी चोरी केली नाही, विनातिकीट प्रवास केला नाही, वाहन चालवताना नियम मोडला नाही, खून-मारामारीही केली नाही. मग कोर्टात जायची वेळ का यावी माझ्यावर? कळेल लवकरच. 

फोन नाट्य
मी McCann advertising मध्ये असताना वडाळा ते परळ बस ने जात असे. तो दिवस होता बुधवार  जून २०२२ ! ऑफिस सुटल्यावर मी बस पकडली. नेहमीप्रमाणे बसमध्ये गर्दी होती. पाऊसाचे दिवस असल्यामुळे हलत्या बसमध्ये उभ्या उभ्या मी छत्री, बॅग सांभाळत तिकिटासाठी बॅग मधून पाकीट काढण्याची जरा अजागळ कसरत करत होतो. तेवढ्यात शेवटच्या सीटवरचा एक प्रवासी उठला आणि मला बसायला जागा मिळाली. हुश्श.

वडाळा स्टेशन जवळ येताच मी उठलो आणि गर्दीतून वाट काढत मागच्या दारातून उतरण्यासाठी पुढे झालो. जसं उतरायची वेळ आली तशी धक्काबुक्कीला सुरुवात झाली. त्या धक्काबुक्कीत माझी बॅग मागे कोणाच्यातरी खांद्यावर अडकली. बॅगमध्ये पाकीट असल्याकारणाने मी बॅग ओढत पुढे हलण्याचा प्रयत्न करत होतो. पूर्ण लक्ष बॅगकडे. कशीबशी बॅग हातात आली आणि मी खाली उतरलो. पण काहीतरी वेगळं, हलकं हलकं वाटत होता. पॅन्टच्या खिशाला हात लावताच डोक्यात वीज चमकली. खिशात माझा मोबाईल नव्हताच! पटकन मी परत बसमध्ये चढलो आणि बसल्या ठिकाणी खाली पडला आहे का ते बघितला. कुठेच नव्हता. दोन सेकंदात मी बाजूला बसलेल्या माणसाला झालेलं थोडक्यात सांगितलं आणि त्याचा फोन घेऊन माझ्या फोनवर फोन केला. फोन बंद! 

त्यात परत माझ्या फोनला मी लॉक कोड ठेवलेला नव्हता (काही लपवण्याचा प्रश्नच नव्हता ना) त्याचाच चोरट्यांनी फायदा घेतला. तेवढ्या दोन मिनिटात चोरट्यांनी माझा फोन Switch Off केला होता. आता वडाळा भाग म्हणजे मुसलमान बाहुल, गलिच्छ भाग. अशा भागात त्या चोरट्यांचा सुळसुळाट त्यामुळे अशा गोष्टी नित्याच्याच.

पोलीस नाट्य
उतरताच मी वडाळा स्टेशन बाहेरच असलेल्या एका मोबाईल दुकानात गेलो, त्याला फोन नाट्य ऐकवलं आणि परत त्याच्या मोबाईलवरून माझा नंबर लावला. बंद तो बंदच!

मग सरळ निश्चय केला आणि चालत सुटलो, पोलीस स्टेशनच्या दिशेने. रात्रीची वेळ होती, अंदाजे ८-८.३० वाजले होते. झपाझप पाऊले टाकत मी वडाळाच्या किडवाई पोलीस चौकीत जाऊन थडकलो. ही चौकी अद्ययावत दिसत होती, म्हणजे चौकी सारखी चौकी नव्हती, चक्क तीन माजली इमारत! पहिल्या मजल्यावर चौकशी केल्यानंतर एका ठिकाणी माझा फोन हरवल्याचे (चोरीला गेला असे नाही) नोंदविले गेले. या कागदाचा उपयोग फक्त नवीन SIM मिळवण्यासाठी होतो, तक्रार नोंदवली गेली नव्हतीच. मी परत विचारलं की तक्रार कुठे नोंदवायची, तर खाकीचे उत्तर आलं, “मोबाईलचा IMEI घेऊन या मग बघू.” तेवढ्या वेळात चौकीत आजूबाजूचेच मुसलमान वस्तीतली भांडणे, चोऱ्या, मारामाऱ्या असे तक्रार नोंदवण्यासाठी, हजेरी देण्यासाठी आणि आरोपी सुद्धा आलेले.

पुढे सरकारी अलिखित नियमाप्रमाणे चारदा किडवाई पोलीस स्टेशन मध्ये चकरा माराव्या लागल्या आणि शेवटी माझा Samsung M ३० S चोरीला गेला अशी FIR नं ५३८ ही ३ जूनला नोंदवण्यात आली.
पुढे अजून दोन चकरा मारल्यानंतर माझ्या हातात FIR देण्यात आली. त्याचबरोबर तिथल्या इन्स्पेक्टरने अगदी नम्रपणे आणि गोड आवाजात स्पष्ट केलं की यापुढे परत परत यायचे नाही आणि आमचे डोके खायचे नाही. मोबाईल परत मिळत नाहीत. आजकाल चोर ताबडतोब मोबाईलचे पोस्टमॉर्टेम करतात, एक एक पार्ट वेगळा करतात आणि ते सुटे पार्ट मार्केट मध्ये विकायला ठेवतात. हे इतक्या झटपट होते की IMEI नंबर वरून फोन ट्रेसिंग साठी ठेवेपर्यंत सुटे केलेले भाग इलेक्ट्रॉनिक बाजारात विकण्यासाठी पोचले सुद्धा असतात.

मला मोबाईल मिळायची आशा कमीच होती पण चोरांची बाजू घेणाऱ्या पोलिसांना FIR नोंदवून इलेक्शन मध्ये NOTA पर्याय निवडून अद्दल घडवण्यासारखे होते.





पुढे जाऊन याच FIR ने मला कोर्टाची पायरी दाखवली आणि प्रक्रियेचा परिचय करून दिला.
पण त्याआधी एक छोटासा कोर्ट नोटीस अंक वाचूया.

नोटीस नाट्य

मोबाईल चोरीला गेला जून २०२२ मध्ये. नोव्हेंबर २०२२ मध्ये दुपारी माझा फोन वाजला. वडाळा पोलीस स्टेशन मधून हवालदाराने फोन केला होता, हे सांगायला की कोर्टामध्ये केस लागली आहे आणि कोर्टाची नोटीस घेऊन जावा. वास्तविक ही नोटीस माझ्या घरी पोचती व्हायला पाहिजे होते (माझ्या समजेप्रमाणे) पण पोलीस कामचुकारपणा करत मला वडाळाला बोलावून त्यांचे काम वाचवत होते. मी कारणे दिली आणि बघू म्हणालो. असेच दोन-तीन महिने गेले. मार्च महिन्यात परत फोन आला, १४ एप्रिलला सुनावणी होणार आहे, नोटीस घेऊन जावा. पहिली नोटीस तारीख होती १४ फेब्रुवारी २०२३, म्हणजे सोमवार. आणि दुसऱ्या नोटीसची तारीख होती २४ एप्रिल म्हणजे शुक्रवार. दोन्ही कामाचे दिवस. मी दुसरी नोटीसही टाळली.

परत तिसऱ्यांदा वडाळा पोलीस स्टेशन मधून फोन आला. यावेळी प्रकरण काहीतरी वेगळं होतं.


त्यांच्यासांगण्याप्रमाणे कोर्टाने केसेस निकालात काढण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह ठेवली आहे आणि त्यासाठी नोटीस सुपूर्द करायची होती. मी म्हटलं मग आणून द्या की. लगेच त्यांचा सूर बदलला. "एक काम करतो, तुम्हाला नोटीस whatsapp ने पाठवतो." मी म्हटलं पाठवा आणि तिथेच फोन संपला. पाचच मिनिटात मला नोटीसचा फोटो मिळाला. ही स्पेशल ड्राईव्ह असल्याकारणाने कामाच्या दिवशी न ठेवता शनिवारी ठेवण्यात आली होती जेणेकरून लोक येतील आणि आमच्यासारख्या फालतू, चोरीच्या किरकोळ तक्रारी काही तपस न करता निकाली काढता याव्यात.

तिसरी नोटीस असल्यामुळे आणि शनिवार आल्यामुळे मी कोर्टात हजार राहायचे ठरवले!

कोर्ट हा काय प्रकार असतो ते मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहणार, अनुभवणार होतो. तसे माझे बाबा स्वतः वकील, शीतलचा चुलत भाऊ वकील पण आतापर्यंत कोर्टात जायची कधी वेळ नव्हती आली. ती या मोबाईल चोरीच्या निमित्ताने आली. चला तर आता थेट कोर्टात जाऊया आणि फोर्ट लढवूया...

कोर्ट नाट्य
आयुष्यात पहिल्यांदाच मी कोर्टात जाणार होतो आणि मी आरोपी नसल्यामुळे साहजिकच भीती कमी आणि उत्सुकता जास्त होती. म्हटलं बघुया तरी कोर्ट असतं कसं, कामकाज कसं चालतं, वकील कसे असतात वगैरे वगैरे. माझे साडू निलेश यांना ही थोडी करमणूक म्हणून येता का विचारलं. हो नाही करत करत ते ही यायला तयार झाले.

निलेशचे बालपण परळ-लालबाग याच परिसरात गेल्यामुळे त्यांना कोर्ट कुठे आहे ते माहित होते.

१५ जुलै २०२३ - शनिवारी सकाळी, आम्ही शिवडी स्टेशन वरून चालत, गप्पा मारत परळ भागात असलेले दादर मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये १०.३० वाजता पोहोचलो. नोटीसप्रमाणे आमची केस रूम नंबर १३ कोर्टमध्ये होणार होती. 



आत गेल्यागेल्या लगेचच उजव्या बाजूला असेलेला सागवान लाकडाचा 'कटघरा' नजरेत भरला आणि हे कोर्ट आहे यावर शिक्कामोर्तब झाला. समोरच एक लांबच्या लांब लाकडी टेबल पसरलेले दिसले. त्याच्या दोन्ही बाजूला ५० वर्षांपूर्वीच्या पण अजूनही भक्कम अशा लाकडी खुर्च्या ठेवलेल्या दिसल्या. उजवीकडे थोडं उंचावर कोर्ट जज वगैरेंची आसनव्यवस्था होती. पण आम्हाला आणि त्या भागाला काचेच्या भिंतीने वेगळे ठेवले गेले होते.

डाव्या बाजूला बघितलं तर अस्सल सरकारी शोकांतिकेची झलक दिसली. अर्ध्यापेक्षा जास्त खोली ही जुन्या पुराण्या फाईल आणि अशा अनेक फाईलचे गट्ठेच्या गट्ठे सगळीकडे पसरलेले होते. किती जुन्या, निकाल न लागलेल्या केस या गठ्ठयात पुरल्या गेल्या असतील कोण जाणे.

राजेंची भेट
वडाळा पोलिसवाल्याने कोर्टातले कारकून गणेश राजे यांचा मोबाईल नंबर मला दिला गेला होता. त्यामुळे त्यांना शोधणे फारसे अवघड राहिले नाही. गणेश राजे हे पोलिसांचा खाकी ड्रेस घातलेले एक हसतमुख रसायन. केस नंबर प्रमाणे त्यांनी रेकॉर्ड मध्ये शोधले आणि माझा नंबर १८४ असल्याचे सांगितले. मी हळूच त्यांना आज नक्की होणार तरी काय हे विचारले आणि या स्पेशल ड्राईव्हचा उद्देश माझ्या लक्षात आला. आज आम्हाला फक्त एवढ्यासाठी बोलावले होते की अशी किरकोळ केस 'active' न राहता तिचे 'अ' वर्गीकरण करायचे म्हणजेच 'active' केस 'passive' करून फाईल मध्ये गाडून टाकायची. आणि परत आश्वासन की जेव्हा केव्हा चोराचा तपस लागेल, तेव्हा केस परत 'open' केली जाईल आणि तुम्हाला तेव्हा कळवण्यात येईल. आता मोबाईल चोरीला जाऊन एक वर्ष उलटलं होतं. या एक वर्षात पोलिसांना चोराचा तपास लावता आला नाही/लावला नाही तर पुढे जाऊन काय दिव्या करणार ज्याने चोर सापडेल हा प्रश्न कायद्याच्या किचकट प्रक्रियेत अनुत्तरित राहणार हे निश्चित.

मी परत हळूच विचारलं, "जर मला केस बंदच करायची असेल तर काय करायचं?" यावर राजे मिश्कीलपणे हसले आणि मला उत्तर मिळालं. “एकदा नोंदवलेली FIR/केस बंद होत नाही. हीच तर गम्मत आहे. आता फक्त 'अ' वर्गीकरण होणार आणि त्याला हो म्हणण्यासाठी मला बोलावले गेले आहे. पण जेव्हा या 'अ' वर्गीकरणाची मुदत संपेल तेव्हा परत बोलावण्यात येईल आणि तेव्हा मी केस बंद करण्यासाठी अर्ज करू शकतो!” आणि अशा प्रकारे यातून बाहेर पडण्याची शक्यता मालवली गेली.

राजेंनी मला बाहेर थांबायला सांगितले आणि नंबर आला की हाक मारण्यात येईल असे सरकारी आश्वासन दिले. मी आणि निलेश निमूटपणे बाजूला उभे राहिलो.

इथून पुढे सुरु होतो मला कोर्टात भेटलेल्या आणि मी निरीक्षण केलेल्या अनेक चित्र विचित्र पात्रांचा परिचय...

मी निलेशना राजेंबरोबरचे बोलणे, 'अ' वर्गीकरण यासंबंधी सांगत होतो तेवढ्यात बाजूला उभा असलेला एक शिडशिडीत शरीरयष्टीचा माणूस आमच्यात येऊन मिसळला. त्याने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. तो विक्रोळीला राहणार होता आणि काही वर्षांपूर्वी त्याची चारचाकी गाडी चोरीला गेली. रीतसर तक्रार केली, पोलीस स्टेशन-कोर्ट-पोलीस स्टेशन अशा सतत चकरा चालू होत्या. आणि गंमत अशी की गाडी त्याच्या बायकोच्या नावावर होती, त्यामुळे तिला सह्या करण्यासाठी सगळीकडे यावं लागायचं. सततच्या हेलपाट्यांनी ती तर अक्षरशः मेटाकुटीला आली आणि वैतागली. शेवटी गाडी सापडली नाहीच पण एवढी धावपळ करून इन्शुरन्सचे पैसे तरी मिळाले. 

मग मी त्याला विचारलं की आज कशासाठी आला आहात? तर म्हणाला की काही दिवसांपूर्वी ऑनलाईन फ्रॉड झाला आणि माझे ४५,००० रुपये गेले, त्यासंबंधी आज आलो आहे. मी मनात म्हटलं की याचं आणि पोलीस स्टेशन-कोर्ट यांच्यात कोणतेतरी पक्कं नातं असणार आणि म्हणूनच आधी गाडीची चोरी आणि आता पैशांचा फ्रॉड याच्याच बाबतीत घडलं.

आता १०.४५ वाजले होते आणि गर्दी हळू हळू वाढायला लागली. कोर्ट खोलीत लोकं जमायला लागली. आम्हीही खोलीत गेलो आणि काही खुर्च्या होत्या त्यावर जाऊन बसलो. राजेंकडे तक्रारदार येणे सतत चालूच होते. तेवढ्यात समोर, वर बसलेले कारकून मंडळी एकदम उठून उभी राहिली. ते बघून कोर्टात नेहमी येणारे वकील वगैरेही उठले. मग आम्ही सगळेही उभे राहिलो. आणि तेवढ्यात पिक्चर मध्ये हिरोची एंट्री होते तशी कोर्टात जजची एंट्री झाली. मी भिंतीवरच्या जुनाट घड्याळाकडे बघितले तर बरोब्बर ११ वाजले होते. म्हणजे कोर्ट अगदी वेळेत सुरु झालं म्हणायचं. जज अंदाजे ३५ वर्षांच्या बाई होत्या. चेहऱ्यावरून मायाळू दिसत होत्या पण आपल्या हुद्द्याचा आणि ताकदीची जण असल्यामुळे आवाजात आणि वागण्यात कडकपणा जाणवत होता.

कामकाजाचा क्रम असा होता. राजे त्या लांब टेबलच्या उजवीकडे उभे होते आणि दुसरे राजेंसारखेच एक डावीकडे उभे होते. राजे एका केसची फाईल वर बसलेल्या कारकुनाकडे द्यायचे. फाईल भराभर पण नीट तपासून वर बसलेला कारकून त्या केसचा नंबर सांगायचा आणि केस मध्ये कोण कोण आहेत त्यांची नावे सांगायचं. मग राजे मोठ्यांदा ती नावे परत घ्यायचे आणि ती माणसे हजार असतील तर पुढे येणार आणि केस सुरु होणार.

केसचे अनेक प्रकार होते, त्यातले काही...
१. या केस कोणत्या प्रकारच्या होत्या ते काही कळाले नाही पण त्यात वकील पक्षांची बाजू मांडायचे. जवळजवळ अशा सर्व केसेस मध्ये 'Exemption' आणि 'Application' हे शब्द नित्याचे कानावर पडत होते. बहुतेक वकील नेहमीचे असावेत कारण जज त्यांच्याशी आदराने बोलत होत्या.

२. या केसेस म्हणजे माझी केस होती तशाच. कोणाचा मोबाईल चोरी गेलेला, कोणाचा लॅपटॉप, बाईक, गाडी वगैरे अशी कोणती महागडी वस्तू. तर अनेक असे होते ज्यांचे पैसे ऑनलाईन फ्रॉड मध्ये गेले होते. आमच्या केसेस पोलीस आणि कायद्याच्या दृष्टीने किरकोळ म्हणून आम्ही सर्व 'अ' वर्गीकरणात होतो.

३. या दोन तासात अशा १ किंवा २ केसेस होत्या ज्या थोड्या गंबीर स्वरूपाच्या, किचकट अशा होत्या. सांगीनच लवकर. 

विचित्र बाई आणि फोन नाट्य
कोर्टात बसल्यापासून माझे निरीक्षण चालूच होते. मला दिसले की एक ठिपक्यांचा शर्ट आणि स्कर्ट घातलेली बाई सतत घाई गडबड करत होती आणि बेचैनपणे वागत होती. कोर्टातली मंडळीपण तिच्या या वागण्यावर नाराज दिसत होती. कोर्ट चालू झाले होते. बसायला जेमतेम ६-७ खुर्च्या होत्या, बाकी सगळे उभेच होते. त्या बाईला बसायचे असणार पण कुठे जागा दिसली नाही म्हणून ती कॉलेजच्या कट्ट्यावर बसतो तसं अगदी जज समोरच असलेल्या एका टेबलावर बसल्या. हे बघून जज बाईंचा स्वर कडक झाला आणि माइकवरून त्यांनी सूचना केली. लगेच कोर्टातले कर्मचारी धावत आले आणि त्या बाईंना टेबल वरून उतरायची सूचना दिली गेली. कुरकुरत बाई उतरल्या पण कारण पण एकदम भारी दिलं, 'मुझे चक्कर आ रही है. कुछ खाया नहीं है." या तिच्या उत्तरावर दया माया न दाखवता जजने खडसावले, "भूक लागी है तो बाहेर जाकर खाके आओ, पर टेबल पे मत बैठो."

वाकडं तोंड करून ती बाई इकडे तिकडे भटकत राहिली. दोनच मिनिटे झाली असतील आणि परत तीच बाई जज समोर हजर. बहुदा तिचीच केस होती. जज आणि कारकुनांचा विचारविनिमय चालू होता. तेवढ्यात त्याच बाईने फोन काढला आणि कोर्टातच फोनवर बोलायला सुरुवात केली, तेही जज च्या अगदी समोर!

व्हायचे तेच झाले. आधीच तिच्यावर जज चिडल्या होत्या म्हणून लगेच कर्मचाऱ्यांनी तिला फोन बंद करण्यास सांगितले पण ही बया ऐकणाऱ्यातली नव्हती. तिने सरळ दुर्लक्ष केले आणि फोनवर बोलणे चालूच ठेवले. हे बघून जज आणखी चिडल्या आणि त्यांनी सरळ फोन जप्त करण्याची ऑर्डर दिली. त्यासरशी दोन कर्मचारी पुढे आले आणि बाईंचा फोन ताब्यात घेतला. या वेळी त्या बाईचे कारण होते, "मेरी माँ हॉस्पिटल में है, और में उससे बात कर रही थी. वह अकेली है वहा पर." पण तिच्या कारणाचा काही उपयोग झाला नाही आणि फोन जज बाईंच्या टेबलावर येऊन बसला. काही वेळाने तिने फोन परत मागितला तेव्हा रु ३०० दंड भरा मगच फोन परत मिळेल असे सुनावले गेले. पैसे मोजल्यावरच तिच्या हातात फोन पडला आणि तिने कोर्टातून फोन करण्याची चूक परत केली नाही.

हा विचित्रपणे इथेच संपत नाही. काही वेळाने त्या बाईंना परत बोलावण्यात आहे. तिला पोलिसांनी जे लिहिले होते ते मान्य आहे का ते विचारले गेले. यावर तिने नाही असे सांगितलं. मग जज म्हणाल्या की मान्य नाही तर तुम्ही एक अर्ज द्या. अर्ज म्हटल्यावर ती बाई परत गडबडली. तिला अर्ज, अर्जी म्हणजे काय तेच कळेना. सारखं एकच विचारत राहिली की यह अर्जी मतलब क्या, कैसे लिखते है. तिला समजावून सांगितले तरी कळायला तयार नाही. अखेर कसंतरी तिला समजावलं गेलं आणि पुढची केस सुरु झाली.        

बाईक वाला
अजून एक विशीतला मुलगा होता. त्याची फाईल काढताच राजेंच्या साथीने काम करणारा कोर्टातला कर्मचारी जरा थबकला. त्याने भराभर केस नीट वाचली, समजून घेतली आणि त्या मुलाला प्रश्न विचारू लागला. "ही बाईक कोणाची? यावर कर्ज होतं का? परत मिळाली कशी?" वगैरे वगैरे असे बरेच खोचक प्रश्न त्याने विचारले. मुलगा हैराण झाला. तेव्हा तो कर्मचारी मिश्कीलपणे हसला आणि मुलाला म्हणाला, "हे प्रश्न आता जज तुला विचारतील तेव्हा तुला उत्तर देता आलं पाहिजे म्हणून विचारतोय." म्हणजे हा कर्मचारी त्या मुलाला थोड्याच वेळात त्याच्यावर येणाऱ्या संकटांशी सामना करण्यासाठी तयार करत होता तर.

मुलगा कटघरा मध्ये उभा राहिला आणि जजने फाईल हातात घेतली. दोन सेकंदात त्यांच्या लक्षात आले की केस सरळ नाही आहे आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुलगा ठाम होता की केस पुढे चालवायची आहे आणि जज ना केस मध्ये गडबड वाटत होती. तेव्हा हा कर्मचारीच त्या केसचे तपशील जज ना सांगू लागला आणि त्यांचे समाधान झाल्यावर पुढची तारीख दिली गेली.

कोर्टात अशी मदतही केली जाते तर!

फाईल नाट्य
मी आणि निलेश खुर्च्यांवर बसून कोर्टातली गंमत बघत होतो. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला तरी राजे माझं नाव काही घेईनात, मला बोलावेनात. बाकीच्या केसेस निकाली निघत होत्या, मीच तिथे बसून होतो. मी ठरवलं की काहीतरी हालचाल केली पाहिजे. मी सरळ राजेंच्या टेबलाकडे सरकलो. टेबल भोवती बऱ्याच लोकांचा गराडा होता. गर्दीतून वाट काढत मी पुढे पोचलो आणि बघून हैराण झालो. सकाळी लवकर येऊन गणेश राजेंकडे नाव नोंदवल्याचा काही उपयोग झाला नव्हता. जो हाजीर तो वजीर या न्यायाने जो कोणी टेबलापाशी येईल आणि केस नंबर आणि आधार कार्डची झेरॉक्स देईल त्याची फाईल लगेच शोधली जायची आणि पुढे सुनावणीसाठी वर दिली जायची. 

मीही लगेच माझा केस नंबर त्या कर्मचाऱ्याला सांगितला आणि माझ्या फाईलचा शोध सुरु झाला. पंधरा मिनिटे झाली, एकामागून एक केसेस सरकत होत्या आणि मी तिथेच उभा होतो. काही वेळाने परत विचारल्यावर कळले की माझी फाईल सापडताच नाही आहे. मी हैराण, आणि माझ्याबरोबर तो कर्मचारीही हैराण. १६२७ फाईल आहे आणि १६२९ फाईलही आहे, फक्त १६२८ (माझा केस नंबर) नाही सापडत. असं कसं ते त्यालाही उमगेना. थांबणं भाग होतं. माझ्याबरोबर अजून तीन जण होते ज्यांची फाईल मिळत नव्हती. त्यात एक मुलगी होती जी सारखी सांगत होती की तिचे ३ वाजताचे विमान आहे आणि तिला जायचंय हे तिने सकाळीच सांगितले होते आणि तरी का उशीर होत आहे. पण कर्मचारी निरुत्तर. पूर्ण कोर्ट मध्ये आमच्या फाईलचा शोध घेतला जात होता आणि एकूण ३ कर्मचारी त्या कामात व्यस्त झाले. बघता बघता दुपारचा एक वाजला, कोर्टातली गर्दी कमी होऊ लागली आणि आम्ही चौघे तिथेच.

तेवढ्यात बरोबरची एक बाई विस्मयचकित होऊन राजेंना म्हणाली, ही काय ही फाईल माझीच आहे. वास्तविक गेला एक तास त्या बाईंची फाईल त्यांच्या नाकाखाली, टेबलवर पडून होती पण ते त्यांच्या लक्षात न आल्यामुळे बाईंना समजलेच नाही.

मंगळसूत्र नाट्य
या बाईंची केस वेगळीच होती. त्यांचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले होते. पोलिसांनीदागिना चोरला गेला. तपास चालू आहे’ असे फक्त नमूद केले होते. पण बाईंचे म्हणणे होते की पोलिसांकडे पुरावा त्यांनी दिला आहे आणि तरी पोलीस काही करत नाही आहेत. त्यांना केस पुढे चालू ठेवायची होती. जज ने विचारले की तुम्हाला पुढच्या वेळी वकील आणावा लागेल आणि पुरावे सादर करावे लागतील तर त्या हो म्हणाल्या. "चोराने माझे मंगळसूत्र हिस्कावाले. आम्ही लगेच कंट्रोल रूम ला फोन केला आणि पुढे असलेल्या सध्या कपड्यातला दोन पोलिसांच्या त्या चोरट्याला पकडले सुद्धा. आम्ही तिकडे गेलो तर तेवढ्यात त्या चोरट्याने दागिने दुसऱ्या व्यक्तीकडे दिले आणि ती व्यक्ती निघून गेली. आणि हा प्रसंग त्या बाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी रेकॉर्ड केला होता. हाच पुरावा त्या सादर करणार होत्या!

 

विडिओ कॉल नाट्य
अजून एक केस होती, माझ्यासारखीच. त्यांचे काहीतरी चोरीला गेले होते आणि ज्यांची वस्तू चोरली गेली होती त्यांची पत्नी कोर्टात आली होती कारण नवरा शहराबाहेर होता आणि पुढचे काही महीने परत येणार नव्हता. पण जज म्हणाल्या की यांना परवानगी नाही या केस मध्ये यायची. पॉवर ऑफ ऍटर्नी लागेल. पण केस करणारा येऊच शकत नाही म्हटल्यावर कोर्ट ने एक अशचर्यचकित होणारे कृत्य केले. त्या बाईला तिच्या मोबाईलवरून नवऱ्याला व्हिडिओ कॉल करण्यास सांगण्यात आले. कॉल लागल्यावर फोन जज समोर धरला गेला आणि जज ने मग त्यांना फोन वर विचारले की केस चालू ठेवायची आहे की तात्पुरती बंद करायची आहे. त्यांनी बंद करा सांगितले आणि तसेच केले गेले. आता कोर्टात अशी virtual साक्ष चालते ही नवीनच ज्ञानात भर पडली. बहुदा कोर्टवर खूपच दबाव असणार की जुन्या, किरकोळ केसेस लवकरात लवकर निकालात काढा आणि म्हणून हे virtual कृत्य!

 

फाईल नाट्य continues...
एवढे सगळे त्या एका खोलीत चालू असताना माझ्या फाईलचा शोध अजून चालूच होता. एक एक करत सर्व केसेस संपत आल्या. चा .३० वाजला तरी शोध चालूच. इतर तिघांच्या मिळत असलेल्या फाईलही मिळाल्या. आता कोर्ट जवळजवळ रिकामे झालं होतं. मी शेवटचा उपाय म्हणून पायाने तीन रेघ जमिनीवर ओढल्या आणि राम राम राम असे तीनदा म्हणालो, असे केल्याने हरवलेल्या वस्तू सापडण्यास मदत होते असे ऐकून होतो. तरी बराच वेळ गेला. शेवटी आम्ही दोघे तिघेच न्यायालयात उरलो असताना माझी फाईल एकदाची सापडली.

 

केस closed
पाचच मिनिटात माझी फाईल वर कारकुनाकडे गेली आणि माझा केस नंबर बोलावण्यात आला. मी कटघरात जाऊन माईकसमोर उभा राहिलो. नेहमीप्रमाणे जज ने विचारलं, "तुमचं नाव सांगा". मी माईक मध्ये सांगितलं. पुढचा प्रश्न, "पोलीस काय म्हणतात त्याला तुमची काही हरकत आहे का?" मी नाही म्हणून सांगितलं. "ही केस बंद करत आहोत." मी OK. थँक यू म्हटलं, खाली उतरून राजेंना कधी सीवूड्स मध्ये भेटू म्हणत बाय बाय केलं, आणि निलेश बरोबर सरळ चालायला लागलो

सध्या पुरतं तरी या मोबाईल नाट्याला पूर्णविराम मिळाला होत. पण तो किती महीने ते पोलिसांनाच माहीत. आम्ही मॅजिस्ट्रेट कोर्ट नंबर १३ ला सलाम ठोकला आणि थेट परळच्या प्रसिद्ध हॉटेल क्षीरसागर कडे प्रस्थान केलं.






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

फासे पारध्यांची गोडी

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने