फासे पारध्यांची गोडी

असा योग परत येणे नाही. मुंबईहून पुण्याला येण्यासाठी आम्ही सगळेच नेहमी उत्सुक असतो. माझे लहानपण पुण्यात गेल्यामुळे माझे ते माहेरघर आहे असे शीतल (बायको) नेहेमी चिडवत असते. ते खरंही आहे म्हणा. मुंबईची असूनही शीतलला हळू हळू पुण्याची गोडी लागली. मुलाचा, ओमचा तर जन्मच पुण्यात झाला असल्यामुळे त्याची या शहराशी नाळ पक्की जुळली गेली आहे. तर आम्ही तिघे १५ ऑगस्ट २०२३ चे औचित्य साधून पुण्याला जाण्याची वाट बघू लागलो. आणि आदल्या रविवारी ओमला ताप आला. तीन दिवसांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर ताप गेला पण प्रचंड आणि निरंतर खोकला सुरू झाला. तब्येत बरी नसल्यामुळे ओमचे पुणे रद्द झाले आणि शीतलचेही. आमची ११ ऑगस्टची ट्रेनची तिकिटे आधीच आरक्षित केली होती. मग मला एकट्याला पुण्याला जाण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. ओमचे आणि शीतलचे तिकीट रद्द करून मी पुण्याला जायला सज्ज झालो आणि योगायोग असा की आदल्यादिवशी माझा बालमित्र समीर मासेकर गुरुवारी १० ऑगस्टला घरी येऊन धडकला. बघता बघता त्याचे त्या रात्री राहायचे ठरले आणि माझे दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर पुण्याला जाण्याचेही. एकापाठोपाठ अनपेक्षित बदल होत चालले होते. चक्रे धडाधड पुढे नेत होती आणि मी भराभर पुण्याच्या दिशेला सरकत होतो

एकटा चाललो असल्यामुळे माझ्यासाठी अख्ख रान मोकळं पडलं होतं. चटकन मी सचिन वनारसे आणि विशाल कामठे या माझ्या शाळेतल्या बालमित्रांबरोबर रविवारी १३ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर (जुने अहमदनगर) येथे जाण्याचा, अनेक वर्षांपासून रखडत असलेला, बेत पक्का केला. मुख्य आकर्षण होते आशिया खंडातील पहिल्या आणि एकमेव रणगाडा संग्रहालयाला भेट! त्याचबरोबर मी वाटेतले अजून दोन तीन आकर्षणे शोधून काढली आणि अहिल्यानगर येथे एक दिवसाच्या सहलीची रूपरेषा पक्की झाली.

ठरल्याप्रमाणे रविवारी १३ ऑगस्ट ला सकाळी ठीक वाजता आम्ही विशाल कामठेच्या मुकुंदनगर येथील घरी भेटलो आणि नगरकडे प्रस्थान केले. वाटेत केसनंद येथील प्रसिद्ध सोमेश्वर भेळ आणि मिसळला थांबून गरमागरम मिसळ आणि रसरशीत भेळ रिचवली. पुढे तासाभरात आम्ही ठरलेल्या नगर रोडवरून पहिल्या ठिकाणी जायचे वळण घेतले. जागा होती आडवाटेवरीलअपरिचित, 'पळवे' गावी असलेले सिध्देश्वर देऊळ.

याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नव्हती पण फोटोमध्ये तरी जुन्या मूर्ती दिसत होत्या म्हणून हे ठिकाण निवडले. मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर आत जायचे होते. रस्ता अगदी अरुंद पण दोन्ही बाजूंनी हिरवळीने नटलेला. १० मिनिटात डांबरी रस्ता संपून गावातला खडबडीत मातीचा रस्ता सुरु झाला. आम्ही चोहीकडे देऊळ सदृश्य कोणती वास्तू दिसते का ते न्याहाळत होतो आणि तेवढ्यात डावीकडे एक कमान दिसली. पाठोपाठ एक कळस आणि खात्री झाली की हेच ते सिध्देश्वर देऊळ.



त्या रस्त्यावर कोणतीच वर्दळ नव्हती, एक माणूसही दिसला नव्हता. सचिनने गाडी रस्त्यावरच थोडी बाजूला लावली आणि आम्ही पायऱ्या उतरून देवळात गेलो. बाहेरून देऊळाचे काम चालू होते. वर उंच कळस चढवला जात होता, भिंतींना तर आधीच बटबटीत निळा रंग फासला गेला होता. एकूण बाहेरून फारसे लोभस रूप राहिले नव्हते. पण मला उत्सुकता होती आतल्या खजिन्याची. बाहेर पटांगणात काही गावकरी होते. आम्ही येताच ते टक  लावून आमच्याकडे बघत आहेत असे वाटले.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देऊळात आणखी पायऱ्या उतरून आम्ही तळघरातील मुख्य देऊळात प्रवेश केला. खरंच हे प्राचीन देऊळ होतं हे लगेच जाणवलं. नंदी चकचकीत पत्र्याचा किंवा चांदीचा नसून दगडी होता. गाभाऱ्यात प्रवेश करायची कमान ही टाईलने सजवता साधीच ठेवण्यात आली होती. आम्ही आधी शिव शंकराचे दर्शन घेतले आणि मग देवळातला खजिना शोधायला सुरुवात केली


गाभाऱ्याच्या दाराबाहेर दोन्ही बाजूंना एक एक वीरगळ भिंतीत लावण्यात आला होता. कोरलेल्या आकृत्या काहीशा पुसट झाल्या होत्या पण कशाचा आहे ते कळणे अवघड नव्हते. थोडं आणखी बाहेर आल्यावर दगडात कोरलेली विष्णूंची मूर्ती नजरेस पडली, बाजूलाच एक दगडी पण पुसट झालेली मूर्ती होती. बघून मला कळले नाही की ही शंकर-पार्वती यांचे रूप आहे की विष्णू-लक्ष्मी आहेतआणखी दोन वीरगळ भिंतीत लेपलेले आढळले. एकूणच आतून तरी अतिशय मोहक असे, आधुनिकतेच्या बरबटून गेलेलं देऊळ बघून आनंद झाला







परत त्या दगडी पायऱ्या चढून देऊळाबाहेर आलो तर कोणी शुकशुक केल्याचे कानावर पडले. विहीर ओलांडून गेलो आणि बघितले तर १०-१२ गावकऱ्यांचा घोळका जमिनीवर गोलाकार करून बसला होता. त्यातल्याच एकाने शुक शुक करून बोलावले होते. जवळ जाताच चौकशी सुरु झाली. आम्ही कुठले, कोणत्या गावाचे, या देऊळाची माहिती कशी मिळाली, इथून कुठे जाणार वगैरे शंभरशे साठ प्रश्न! आम्ही उत्तरं देतंच होतो की एका गावकऱ्याने एका कागदी प्लेट मध्ये जिलब्यांचा ढीग माझ्या हातात दिला, म्हणाला प्रसाद आहे. बरोबर आणखी एका प्लेट मध्ये चिरमुरे आणि फरसाण भरून दिले. आम्ही नुकताच भरपेट नाश्ता करून इथे आलो होतो त्यामुळे भूक अजिबात नव्हती. पण गावकरी ऐकायलाच तयार नाहीत. बळबळच त्यांनी आमच्या हातात प्लेट कोंबल्या आणि खायला सांगितले. मी एक जिलेबी उचलली आणि तोंडात टाकली. सुंदर चव, तेलाचा अजिबात वास नाही, पुरेपूर गोड अशी जिलेबी खाऊन बरं वाटलं.

चौकशी अजून सुरूच होती. खाण्यासाठी आम्ही तिथल्याच एका बाकावर बसलो. खाणे चालू असताना गावकरी आमच्याभोवती जमले. आम्हाला निश्चितपणे खात असलेले बघून हळूच एक त्यांच्यातला जरा तरतरीत, ज्येष्ठ गावकरी पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला, "पोरांनो तुम्ही पुण्या मुंबईहून आला आहात म्हणून सांगतो, लक्ष ठेवून राहावा. इथे फासे पारध्यांची टोळी कार्यरत आहे. ते काय करतात की तुमच्यासारखे शहरातले लोक दिसले की अंगावर किती सोनं आहे ते हेरतात. मग बोलून पैशाचे असे अमिश दाखवतात की माणूस फसणारच. मग त्याला या देवळात किंवा कोणत्या निर्जन ठिकाणी ठराविक वेळी यायला सांगतात आणि अमाप पैशाची गळ घालतात. हा किंवा ही शहरी माणसे त्या ठिकाणी पोचली की १५-२० फासेपारधी तयारीतच असतात. काठ्यांनी बडवून त्या माणसाला अधमरं करतात आणि त्याच्याकडच्या सर्व मौल्यवान वस्तू घेऊन पसार होतात. आज ही अशा प्रकारचे लुटमारीचे प्रकार या भागात घडत आहेत."

एवढे बोलून त्याने बॉम्ब टाकला, "आम्हाला वाटले की तुम्ही असेच फसला आहात. कोणी फासे पारध्याने तुम्हाला इथे बोलावले आहे आणि म्हणून तुम्ही इथे आला आहात. आणि म्हणून वाटले की तुम्हाला सावधान करावे, म्हणून तुमची एवढी विचारपूस करत होतो." आता आमच्या डोक्यात प्रकाश पडला. आजही फासे पारधी कार्यरत आहेत आणि अशी लूटमार करण्यात मग्न आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. माझे जिलबीवर ताव मारणे चालूच होते, त्यात परत सचिन आणि विशाल दोघांना मधुमेह असल्यामुळे त्यांच्या जिलबी ही माझ्या वाटेल आल्या.

अजून गोष्ट संपली नाही हं

आम्हाला सावधान करून दोनच मिनिटे झाली होती की दुसरा एक तरुण गावकरी पुढे आला आणि हळू आवाजात सांगायला लागला. "एकदा असाच एक माणूस फसला आणि इकडे आला. त्याला मार मार चोपला आणि हातातल्या अंगठीसाठी फासे  पारध्यांनी त्याचे बोटच कापून घेतले." एका हातात जिलबी धरून, मी करून फासे पारध्यांची गोष्ट ऐकत होतो. एवढे सांगून गावकरी जायला निघाले. मी निवांत त्या अमृतसमान गोड जिलबींचा आस्वाद घेतला आणि मगच उठलो, पण मनात फासे पारधी घर करून होते. हात धुवून, प्रसादकरता असलेली भीमकाय कढई बघून आणि एक वाटेत कोणालासाठी गाडी थांबवायची नाही, कोणाला गाडीत घ्यायचे नाही वगैरे वगैरे एक दुसऱ्याला बजावून आम्ही देऊळाचा गोड निरोप घेतला. पण त्याआधी एकमेकांचे हात, बोटे, गळा नजरेने  तपासले की कोणाकडे सोन्याचे दागिने तर नाहीत ना.


नगरचा रस्ता शोधता शोधता मला हे पुरातन देऊळ सापडले. मुख्य रणगाडा संग्रहालय बघण्यासाठी निघालेलो आमचे त्रिकुटने या जागी थांबायचं निर्णय घेतला. आणि अनपेक्षितपणे फासे पारध्यांमुळे सुरस जिलब्यांचा नेवैद्य मिळाला

फासे पारधी मुळे कसा ते विचारता? अहो गावकऱ्यांना शंका आली की आम्ही फासे पारध्यांच्या जाळ्यात अडकून इथे देऊळात आलो आहे आणि म्हणूनच त्यांनी मला बोलावून चौकशी केली.

म्हणजे त्या फासे पारध्यांमुळेच तर त्या आम्हाला जिलेब्यांचा गोडगोड प्रसाद मिळाला होता ना!

 - धवल रामतीर्थकर

Route:

4 hr 2 min (145 km)

https://maps.app.goo.gl/X9kuFBSHz9NQc8eLA


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने