उसात हरवण्याची किमया
बऱ्याच वर्षांनी मी पुण्याला एकट्याने एक आठवडा राहण्याचा योग आला होता. असे पुन्हा पुन्हा होणे नाही म्हणून मी मनसोक्त भटकंती करण्याचे ठरवले. रविवारी म्हणजे १३ ऑगस्ट २०२३ रोजी सचिन वनारसे आणि विशाल कामठे या शालेय मित्रांबरोबर अहिल्यानगर (जुने अहमदनगर), मंगळवारी १५ ऑगस्ट निमित्त पुणे हेरिटेज वॉक तर्फे आयोजित फ्रीडम बाईक ट्रेल, आणि गुरुवारी समीर मासेकर आणि शैलेश उंडे या बालमित्रांबरोबर अपरिचित अशा खंडी असे तीन दिवस, मनातील तीन ठिकाणे फिरून, बघून झाली. खंडी येथे डोंगर, दऱ्या अंगावर हिरवा शालू पांघरून बसलेल्या निसर्गात बागडत असताना फोन वाजला. बघितलं तर सचिन वनारसे. मला वाटलं सहज फोन केला असेल. उचलला तर पहिला प्रश्न, "उद्या, शुक्रवारी शेतात येतोय का?" मी लगेच माझा होकार कळवून टाकला आणि आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवसाची धमाल करण्यासाठी सज्ज झालो.
दौंड तालुक्यातील यवत गावात, मिठबाव इथे त्यांच्या ७-८ एकर मध्ये पसरलेल्या सचिनच्या शेतात जायचे म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच. पहिल्यांदा गेलो तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. सकाळी सकाळी शेत सांभाळणारा गडी शेतातला एक पट्टा हातातल्या मशीनने नांगरत असताना मातीखालून उडणाऱ्या किड्यांना अचूक टिपणारे विविधरंगी पक्षी बघत, शेवग्याच्या झाडांमध्ये फिरत, काळ्या मातीत बागडत, खालच्या पट्ट्यातली उसाची उंच शेती लांबून बघत, केडगाव मधील पुणे - सोलापूर हायवे वरील प्रसिद्ध हॉटेल तुळजाभवानी मधील मटण मटकावत आणि आजूबाजूच्या धरणावर, MSEB ऑफिस मध्ये चक्कर मारत आणि देऊळे करत करत दिवस कसा संपला कळले सुद्धा नाही.
दुसऱ्यांदा बायको शीतल आणि मुलगा ओम यांनाही निमंत्रण मिळाले. मग काय, त्यांनाही शेताची मजा चाखायला मिळाली. या वेळी बायको-मुलगा बरोबर असल्यामुळे शेतीबरोबरच पुरातन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले भुलेश्वर देऊळही बघून झाले, बारीकशा पुलावरून तोल सांभाळत उसाच्या शेतात, विहिरीवर जाणे झाले आणि ते अगणित क्षण जमेल तितके फोटोत टिपत तोही दिवस भुर्रकन उडून गेला.
आता हे तिसऱ्यांदा
जाणे होते. पावसाळ्याचे
दिवस होते पण यवत वगैरे
तिकडचा भाग म्हणजे
कोरडा भाग समजला
जातो. तिकडे खूप
पाऊस पडत नसतो
आणि म्हणून माझ्यासारख्या
शहरात वाढलेल्या माणसाला
पावसाळ्यातील शेत हा
काय प्रकार असतो
त्याचे कणभरही ज्ञान
आणि अनुभव नव्हता.
मी नेहसमीसारखे कपडे,
म्हणजे ३/४th आणि हाल्फ
टी शर्ट अशा
वेशात प्रयाण केले.
शेतात पाय ठेवताच
मला माझी चूक
उमजली. रानटी रोपे,
वेल सगळीकडे पसरले
होते, त्यात परत
झाडी म्हणजे डास
आले. माझा अवतार
म्हणजे त्यांच्यासाठी मेजवानीच
जणू. पण आता इलाज नव्हता.
असेल त्यात निभावणे भाग
होते.
सचिन मात्र उचित कपडे घालून वावरत होता. अंगात पांढरा फुल शर्ट, खाली जीन्स पॅन्ट आणि पायात बूट असा त्याचा शेतात फिरण्यासाठी परिपूर्ण वेष.
वरच्या तुकड्याकडेला लावलेली केळीची झाडे बघण्याकडे प्रयाण झाले आणि त्या केळीच्या बनात झाडाला लगडलेली केळफुलातली केळ्यांची नवी पिढी बघेपर्यंत डासांनी मला फोडून खाल्ले. काय करणार, चूक त्यांची नाही माझीच होती. वरच्या दुसऱ्या तुकड्यातली शेवग्याची झाडे आता कापून टाकण्यात आली होती. कारण होते आपल्याला निरागस वाटणारी गोगलगाय! पण ही गोगलगाय वेगळी, शेतातल्या उभ्या पिकांना बघता बघता फस्त करून टाकते. नुकसान नको म्हणून सचिनने शेवग्याची झाडेच काढून त्याजागी वेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला
शेळ्या मेंढ्यांमध्ये
सचिनचे बाबा गड्याला
काय काय काम करायचे ते सांगून देखरेख करत होते. तोडलेली शेवग्याच्या झाडांच्या लांबच्या
लांब काटक्या ढीग करून ठेवाव्या लागतात. त्या काटक्या उचलण्याचे थोडे जुजबी काम करून
आमची पावले वळली वरच्या पट्ट्याकडे आणि खालच्या उसाच्या पट्ट्यामधोमध असणाऱ्या कॅनाल
कडे. डावीकडच्या नांगरलेल्या शेतात बघितलं तर बऱ्याच बकऱ्या कुंपणात पहुडलेल्या दिसल्या.
सचिनला विचारले तर समजले की शेतकरी या मेंढपाळांना पैसे देऊन आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्या
आणायला सांगतात. शेळ्यांची लेंडी कडक असते. त्यामुळे ती लगेच पाण्यात मुरत आणि विरघळून
जात नाही आणि बरेच दिवस झाडांना पोषण मिळत राहते.
शेळ्या बघाव्यात म्हणून आम्ही तिकडे मोर्चा वळवला. तिथे जाताच सचिनने माझ्या हातात एक लेंडी दिली. अक्षरशः M-seal सारखी घट्ट. अशा अनेक गोष्टी असतात ज्या शेतात काम करूनच, अनुभवातूनच कळतात. तिथे एक मेंढपाळ बाई होती. तिने आम्हाला सावधान केले, म्हणाली की आत कुंपणात जाऊ नका, मारक्या शेळ्या हायत. मग आम्ही दोन हात लांबच राहिलो. त्यांना विचारलं की बिबट्या येत नाही का तर म्हणाल्या येतो की. एखादं दुसरं जनावर उचलतो, परवाच एक बकरी घेऊन गेला. त्यांच्यासाठी हे नेहमीचेच होते असे सहजपाणे त्या सांगत होत्या, निसर्गाचा खेळ हा.
![]() |
| हातात एक कुर्हाड, बाजूला अजून एक कुर्हाड. दिवसा काटक्या तोडण्यासाठी आणि रात्री बिबट्या! |
सचिनने एका ठिकाणी शेळ्यांना ठेवलेल्या जाळीचे कुंपण खाली केले आणि एक दोन दिवसांचे इवलेसे पांढरेशुभ्र शेळीचे बछडे वर उचलले. बॅह…बॅह करत ते आमच्या हातात, कुशीत निपचित बसले, बहुतेक खूपच लहान असल्यामुळे असेल. आम्ही यथेच्छ फोटो काढून घेतले. बछड्याला कुरवाळून हातात धरले तर त्याच्या अंगात धडधडणाऱ्या छोट्याशा छातीचे ठोके हाताला लगेच जाणवले. हे मेंढपाळ दर दोन दिवसांनी शेतातली आपली जागा बदलतात. असं करत करत शेतात सगळीकडे लेंडी खत पसरते आणि पुढच्या पिकांना नैसर्गिक बुस्टर देते. एरवी शहरातून बाहेर गेल्यावर, आडरस्त्यावर असेच शेळ्या-मेंढ्यांचे कळप रस्त्यावर दिसतात, पण एवढ्या जवळून, बछड्याला कुरवाळायला गावांच्या हृदयात म्हणजे शेतातच जावे लागते
ऊस... आम्ही आलोssss
पुढचा पाडाव होता ऊस.
सचिनला विचारले तर म्हणाला की खाली ५ एकर उसाची शेती आहे. मागच्या दोन वेळी आलेलो असताना
उसाच्या शेतीच्या मुखावर असलेल्या विहिरीपर्यंत जाणे झाले होते. यावेळी ना वेळेचे बंधन
होते, ना कुटुंबाचे. सचिनला म्हटलं, चल उसाची शेती पसरली आहे त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत
जाऊन बघू. तोही बहुदा फारसा तिकडे गेला नव्हता, कारणही नसायचे. जेव्हा, म्हणजे दर शुक्रवारी
तो शेतावर येतो तेव्हा बाकीची कामेच इतकी असतात की असं निवांतपणे हुंदडणे केवळ अशक्यच.
आज मी, एक दिवसाचा पाहुणा, आल्यामुळे तोही लगेच कबूल झाला.
शेतात सर्वत्र उसाचं ऊस पसरला होता, आणि तोही चांगला ७-८ फूट उंच, डोक्यावर चक्क ३-४ फूट उंच! समोर उसामधून रस्ता, म्हणजे पायवाट केलेली दिसत होती. सचिनच्या बोलण्यात सारखे येत होते की आम्ही आताच ऊस बांधून घेतला आहे. दोन तीनदा ऊस बांधून घेतला, बांधून घेतला असे बोलण्यात आले तेव्हा मी त्याला विचारले, हे बांधून घेणे म्हणजे काय रे? तर म्हणाला, ही समोर वाट दिसत आहे ना, ती ऊस बांधल्यामुळे तयार झाली आहे. चक्क हाताने ऊस एकीकडे दाबावा लागतो. दोन्हीकडचा ऊस असा त्या त्या दिशेला दाबला की मध्ये वाट निर्माण होते आणि त्याला ऊस बांधणे म्हणतात. तर अशा ऊस बांधलेल्या वाटेवरून आम्ही पुढे पुढे, आत आत जाऊ लागलो. चहूकडे जांभळ्या रंगाचा कोवळा ऊस उंच उभा होता आणि आम्ही दोन ठेंगणे जीव त्यांच्यामध्ये बागडत होतो.
![]() |
| माझ्या मागे जी उसाच्या मधून गेलेली वाट दिसत आहे ना, त्याला म्हणतात ऊस बांधणे! |
काही वेळ पुढे चालत राहीलो आणि उसाच्या भिंतीबाहेर आलो. समोर बाभळीच्या झाडांचे वन पसरले होते. बघू तिकडे ही काटेरी मोठी मोठी, भराभर वाढणारी बाभळीची झाडे. असे समजले की ही जमीनही सचिन अर्थात वनारसे यांचीच आहे. याचं काय करणार आहे असे विचारताच म्हणाला की जशी ही जमीन साफ करून ऊस लावला तसंच ही बाभळीने भरलेली जमीनसुद्धा भविष्यात विकसित करणार आहे. मी म्हणालो हे कसं करणार? कारण बाभळीचे वन काढणे किती कठीण काम असते हे मी शहरातील वृक्षारोपणाच्या वेळी चांगलेच अनुभवले आहे. आमच्या इथे सीवूड्स परिसरात पदपथावर झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात एका ठिकाणी मध्यम आकाराचे बाभळीचे झाड असलेले आढळले. एक एक करून त्या बाभळीच्या फांदी तोडताना असंख्य काट्यांनी कातडी सोलली गेली होती. एवढे करून काही आठवड्यांनी चक्कर मारली तर परत ते तोडलेले झाड आपल्या पूर्ववत स्थितीत वाढलेले आढळले एवढे कष्ट, एवढे टोचून घेऊन तसा काहीच उपयोग झालेला नव्हता. आणि इथे तर समोर अशा अनेक, मोठ्या बाभळीचे वनच दिसत होते. यावर सचिनचे उत्तर एकदम सहज होते, JCB आणणार आणि साफ करून घेणार. JCB जर बाभळीच्या झाडांची एवढी सहज सफाई करू शकत असले तर त्याला खूपच संहारक पण शेतीसाठी जमीन तयार करण्यासाठी एक वरदानच म्हणायला हवे.
आज, आतापर्यंत माझा शेतातला अनुभव शेळ्यांनी अविस्मरणीय केला होता. पण खरा थरार आणि आयुष्यभर आठवणीत राहतील असे क्षण तर पुढे येणार होते
ऊसातला थरार सुरु
आम्ही ऊसाच्या शेताच्या शेवट्पर्यंत
आलो होतो. आता
परत जायची वेळ
झाली, जाऊन हॉटेल
मधून दुपारचे जेवण
आणायचे होते. चालत,
बोलत आम्ही परत
ऊसात घुसलो. थोडं
पुढे जाताच जाणवलं
की आम्हाला पुढे
जाण्यासाठी वाट आता
नाहीशी झाली आहे.
तरी त्याकडे फारसे
लक्ष न देता आम्ही ऊस
बाजूला करत करत पुढे सरकू
लागलो. १० मिनिटे
असे मार्गक्रमण केले
आणि आता सचिनच्या
लक्षात आले की हे त्यांचे
शेत नाही तर बाजूच्यांच्या शेतातल्या उसात
आम्ही घुसलो होतो.
कारण सचिनच्या शेतातला
ऊस जसा बांधला
होता आणि चालण्यासाठी
व्यवस्थित वाट तयार
केली गेली होती
तसं या शेतात काहीच केले
गेले नव्हते. ऊस वेडावाकडा उभा होता,
बांधला गेला नव्हता.
यात अजून एक अडचण माझ्या
लक्षात आली, माझा
वेष! आधी सांगितल्याप्रमाणे
मी ३/४ th पॅन्ट आणि
अंगात अर्धा टी
शर्ट घातला होता
आणि हा वेष शेतातही चालणार नव्हता
आणि इथे ऊसाच्या
शेतात तर नाहीच
नाही. ऊसाची पाते
दिसायला मस्त हिरवीगार
पण कडा अतिशय
धारधार असतात, अगदी
ब्लेड सारख्या. आधी
मी या उसाच्या
पात्यांबद्दल ऐकून होतो,
पण आता त्यांचा
अनुभव घ्यायची वेळ
आली होती. फजिती
होणार हे नक्की,
जास्त इजा होऊ नये हीच
इच्छा होती, पण
आता काही पर्याय
दिसत नव्हता.
मग मी सचिनला निक्षून सांगितले की तू पुढे हो आणि मी तुझ्या मागून येतो. याचे दोन फायदे होणार होते, एकतर फुल् शर्ट आणि जीन्स पँटमुळे सचिनचे पूर्ण अंग झाकले गेले होते आणि उसाच्या पात्यांपासून त्याला संरक्षण मिळणार होते. आणि तो पुढे असला म्हणजे मला आपसूक त्या रानटी उसात छोटासा रस्ता तयार होणार होता ज्यातून माझ्या असंरक्षित शरीराला पुढे जाणे शक्य होणार होते, जास्त इजा न होता, अशी आशा होती.
तर असे आमचे मार्गक्रमण सुरु झाले. जाऊ तिथे उसाचे तांडे आणि धारधार पाते समोर रस्ता रोखून उभी. सचिन पुढे जात होता आणि मी त्याच्या मागे, पण आता तेही अवघड होऊ लागले कारण सचिन पुढे जात असला तरी तो ऊस दाबत नव्हता. त्यामुळे ऊस काही क्षणांसाठी बाजूला होत होता पण परत पूर्वपदावर येऊन वाट अडवायला तयार असायचा. त्यातून मार्ग काढायचा म्हणजे अंगभर सपासप कापून घ्यायचे हे नक्की.
मग मी एक
शक्कल लढवली. मी
ऊसातून मागे मागे उलटा
चालायला लागलो. याने
झाले काय की माझे उघडे
हात आत पुढे नव्हते तर
पाठीमागे गेले होते
आणि त्यांना पाठीचे
संरक्षण मिळणार होते.
पण असे चालणेही
सोपे नव्हते. पावसाळा
असल्यामुळे आणि ऊसाच्या
रानटी शेतात आल्यामुळे
खाली रानटी झाडे
आणि वेल वाढले
होते. त्यात वारंवार
पाय अडकत होता
आणि तोल जाऊन
परत उसाच्या पात्यांवर
पडण्याचा धोका निर्माण
झाला.
तसंच थोडं थोडं करत पुढची १०-१५ मिनिटे आम्ही इकडे तिकडे मोकळ्या जागेत जाता येते का ते बघू लागलो. पण जाऊ तिथे तेच, पुढे, मागे, उजवीकडे, डावीकडे, वरसुद्धा नुसता ऊस ऊस आणि ऊस!
आता सचिनही चिंतातुर
दिसू लागला. असे
जास्त वेळ मार्गक्रमण
करणेही शक्य दिसत
नव्हते आणि तिथेच
उसात थांबून राहणे
हा ही योग्य
पर्याय नव्हता. लवकरात
लवकर उसाच्या कचाट्यातून
सुटणे क्रमप्राप्त होते.
त्याला दोन कारणे...
एकतर पावसाळा असल्यामुळे
आणि आजूबाजूला सगळी
शेतीच असल्यामुळे शेतात
सापांची सुळसुळाट असते.
अशा निबीड उसात
तर साप असणारच.
आणि दुसरे म्हणजे
असे उंच उंच ऊसाचे शेत
म्हणजे दिवसा बिबट्याला
राहण्यासाठी उत्तम ठिकाण.
त्या पालापाचोळ्याने भरलेल्या
जमिनीवर, उसाचे पाते
चकवत मार्ग काढताना
नकळत पायाखाली साप
येण्याची शक्यता फारच
वाढलेली. तसंच उसाची
जाळी सरकवून पुढे
पाऊल टाकताच बिबट्याला
सरप्राईझ करून आपला
जीव धोक्यात घालण्याची
शक्यताही भयंकर वाढली
होती. जिथे एक एक पाऊल
जपून टाकावे लागत
होते, तिथे बिबट्या
समोर आला तर पळण्याचा विचारही करू
शकत नव्हतो.
ऊस… दिसेल तिथे
घूस
वाळवंटात मृगजळ बघितल्यावर
कशी फजिती होते अगदी तसे आमचे वारंवार होत होते. कधी मला उजवीकडे मोकळी जागा दिसायची
तर कधी सचिनला त्याचे शेत पुढे दिसायचे, पण पुढे जाताच परत तीच उसाची धारधार भिंत आमच्यासमोर
उभी ठाकायची. जणू उसाच्या शेतीने आम्हाला गिळंकृत केले होते. काही पाऊले पुढे गेलो
आणि मला डावीकडून पाण्याचा आवाज आला. मी लगेच सचिनला ही वार्ता दिली. त्याने ऐकली आणि
न ऐकल्यासारखं केलं. मी परत त्याला सांगितलं, यावेळी त्याने थेट उडवून लावली, नाही
रे पाणी बिणी काही नाही. मला पक्की खात्री होती की येणार आवाज पाण्याचा होता. पण ऊसातून
बाहेर पडण्याची धडपड एवढी जास्त होती की त्यात ही गोष्ट विरून गेली. सचिन माझ्या चार
पाऊल पुढे असायचा. अनेक वेळा असे व्हायचे की ऊस इतका दाट होता की एक पाऊल जरी पुढे
गेला तरी मला तो दिसेनासा व्हायचा. आणि त्या ऊसात तो कोणत्या दिशेने गेला आहे ते कळणेही
अशक्य. मग आरोळी द्यायची आणि त्याच्या उत्तराची वाट बघायची, हा नित्यक्रम झाला होता.
ऊ सासा
आणखी १५ मिनिटे गेली, आम्ही धडपडत होतो, पाय वेली मध्ये अडकत होते, तोल जात होता, ऊसाचे पाते घासून जात होते, पण त्या ऊसाच्या रानटी शेतातून बाहेर पडण्याचा मार्ग काही सापडेना. अचानक सचिन ओरडला, मिळाला! मला वाटलं आणखी एक मृगजळ असेल. जाऊन बघितलं तर खरोखर ऊसाच्या दोन भिंतींमधून एक वाट दोन्ही बाजूला गेलेली दिसली. हुर्रे, शेवटी वाट सापडली, सचिनचे बांधलेले शेत आले, आम्ही ऊसाच्या कचाट्यातून सुटलो!
पुढच्या पाचच मिनिटात आम्ही विहिरीपाशी आलो आणि ऊसाच्या शेतातून पूर्णपणे बाहेर पडलो. बाजूलाच एक झाड आपली शीतल सावली पाडून आम्हाला निमंत्रित करत होते. आम्ही तरी नाही का म्हणू? दोन दमलेले, ऊसाच्या शेतात हरवलेले जीव झाडाच्या सावलीत विसावले.
काही क्षण गेले, आम्ही त्या मायाजाळातून मूळ आयुष्यात परतलो आणि माझे लक्ष माझ्या पायांकडे गेले. दोन्ही पायांवर, गुडघ्यांवर उभ्या लाल रेषा उमटल्या होत्या. हातांकडे बघितलं तर हातावरही आडव्या तिडव्या लाल रेषा आढळल्या. उसाने चांगलाच समाचार घेतला होता. सचिन मिश्कीलपणे हसत म्हणाला, आता काही नाही होणार, अंघोळ करताना मजा येईल. कुठून रक्त येत नव्हते हे नशीब समजायचं. सचिनच्या मागे चालून, हातांना वाचवण्यासाठी उलट चालूनही चरे, खरचटणे, ओरखडण्यांपासून सुटका झाली नव्हती.
काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही उठलो. टनभर रसभरीत उसात तासभर भटकूनही आमच्या घशाला कोरड पडली होती आणि पाण्याकडे आपसूक पावले वळाली.
आपण चक्रव्यूहात अडकतो, रस्ता चुकतो, नवीन शहरात बावचळतो, बोलण्यात चुकतो, आयुष्यातही चुकतो, पण सहसा ऊसाच्या शेतात वाट चुकल्याचे ऐकिवात नाही. आता आम्ही ती किमयाही साधली!
गोड लागणाऱ्या ऊसाने आज चांगलीच फिरकी घेतली होती तर!
- धवल रामतीर्थकर






Comments
Post a Comment