एक वाक्य, एक तास, चार स्त्री पॉवर

फिरस्ती महाराष्ट्र तर्फे पळसदेव येथील शिव आणि विष्णू देवळांचे सुरेख दर्शन झाले. पुढील दोन -तीन महिन्यात ही देऊळे उजनी धरणाच्या पाण्याखाली समाधी घेणार. ही देऊळे बघून झाल्यानंतर उजनी धरणाच्या दुसऱ्या तटावर एका छोट्याशा उंचवट्यावर असलेले सरडेश्वर देऊळ येथे दुपारच्या रणरणत्या उन्हात जाणे झाले. देवळाच्या बाहेरील भागात रामायणातील अप्रतिम कलाकुसर बघून मन तृप्त झाले. दुपारी भिगवण येथे संदीप नागरे यांच्या 'अग्निपंख' घरी, छान दुपारच्या वाऱ्यात स्वादिष्ट पिठलं-भाकरी जेवण रिचवलं आणि भिगवण पासून अंदाजे २० कि मी असलेल्या प्राचीन राशीन देवीच्या देवळात दोन उंच दीपमाळा बघून घेतल्या.

पळसदेव शंकर देऊळ - हे उजनी धरण क्षेत्रात असल्यामुळे वर्षभर धरणाच्या पाण्याखाली असते आणि फक्त एप्रिल-मे महिन्यात पाण्यावर येते ते पण दर वर्षी नाही. १९७५ पासून २०२४ पर्यंत फक्त ५ वेळा हे देऊळ पूर्ण पाण्याबाहेर आले आहे.



पळसदेव देऊळ उजनी धारण क्षेत्राच्या मधोमध आहे. धरणाच्या दुसऱ्या तटावर, एका छोटाशा कड्यावर हे सरडेश्वर देऊळ उभे दिसते. इथे रामायणातील अनेक प्रसंग अप्रतिम रित्या देवळाच्या बाहेरील भागात कोरलेले आढळतात.
एवढं करण्यात, बघण्यात, समजण्यात दुपारचे ४.३०-५ वाजले. अर्रे, इतक्यात चहाची वेळ पण झाली. पहिल्या हॉटेलात थांबलो, तर पठ्ठयाचे दूधच नासले. परत २० मंडळी बस मध्ये चढली आणि पुढच्या हॉटेलात जाऊन विसावली. चहा झाला आणि पुण्याकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. अंदाजे १२० कि मी अंतर कापायचे म्हणजे सोलापूर महामार्गावर ३ तास तर हमखास लागणारच. अनेक वेळा असे अनुभवले आहे की परतीच्या प्रवासात शांतता असते. दिवसभर फिरून, भटकून, ट्रेक करून, धम्माल करून जीव दमलेले असतात, त्यामुळे परतीचा प्रवास म्हणजे हक्काचा Me-time. यात काही जण बसल्या क्षणी झोपेच्या स्वाधीन होतात, काही आपल्या विचारात, दिवसभराच्या घटना आठणींमध्ये तल्लीन होतात. काही मोबाईल मध्ये कैद केलेले दिवसभराचे क्षण बघण्यात हरवून जातात तर काही तुरळक जण खिडकीच्या बाहेर पसरलेल्या नजाऱ्याची मजा  घेण्यात मग्न होतात. या वेळीही असेच काही चालू होते.

पुणे ते भिगवण प्रवासात खिडकी सीटवर वृषाली उपासनी बसल्या होत्या आणि मी त्यांच्या बाजूचे रिक्त आसन बळकावले होते. डावीकडच्या सिंगल सीटवर मंजिरी रानडे बसल्या होत्या तर त्यांच्या पुढच्या सीटवर आरती पेंढारकर आणि त्यांचा पिटुकला शहाणा मुलगा आराध्य विराजमान होते. माझ्या पुढच्या सीटवर रुपाली भारगुडे बसल्या होत्या. भिगवणहून परत पुण्याकडे निघाल्यावर वृषाली यांच्या मनात काय आले कोणास ठेवून, त्यांनी मला स्वतःहून खिडकी सीट बहाल केली. मग काय मी निवांतपणे खिडकीतून बाहेरचा वेगाने मागे धावणारा प्रदेश बघत बसलो. खिडकीतून सुंदर सूर्यास्तचेही दर्शन झाले आणि बघता बघता बाहेर अंधार पडला.

आणि इतक्यात मंजिरी यांचे एक accent ने डबडबलेले वाक्य कानावर पडले, "हे फारसी आहे का?" यावर रुपाली ने दिलेले उत्तर ऐकू आले, "नाही, मी फिटनेस बद्दल वाचत आहे." त्यांच्या पलीकडच्या सीटवर बसलेल्या रुपाली यांच्या मोबाईल मध्ये बघून त्या उद्गारला होत्या तर.

मंजिरी, "ओह, मला एकदम वाटलं फारसी आहे."
आणि यावरून पुढचा अर्धा एक तास त्यांचे गप्पांचा फड असा काही रंगला की आजुबाजुचेही आपसूक त्यांच्यात सामील झाले आणि सोलापूर रोडवरचा परतीचा प्रवास चुटकीत संपला.


सुरुवात फारसीच्या गैरसमजुतीने झाली आणि त्यातून वेगवेगळ्या विषयांना पाय फुटत गेले. मध्येच बायकांचे नाजूक विषय, मग फिटनेस आणि मेडिटेशन बद्दल बोलणे सुरु झाले. त्यातून एक धागा पकडला गेला वेगवेगळ्या साड्यांच्या प्रकारचा आणि मंजिरी यांनी त्यांचे साड्या याबद्दल त्यांचे अफाट ज्ञान त्या व्हॅन मध्ये मुक्तपणे उधळले. रुपाली यांच्या बोलण्यातून जाणवले की त्या IT क्षेत्रात कार्यरत होत्या आणि प्रोजेक्ट निमित्ताने परदेश वारी घडली होती.

मंजिरी यांचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या बोलण्यात परदेशात बरीच वर्षे राहिलेल्यांचा भरगच्च accent होता पण त्या मराठी accent मध्येच बोलत असल्या तरी मराठी एकदम शुद्ध होतं आणि शब्दरचना अचूक.

साड्यांचा विषय निघाल्यावर इतक्या वेळ शांत बसलेल्या वृषाली यांनी ही गप्पांमध्ये उडी मारली आणि पैठणीचा विषय जोडला.

मग पुढे बसलेल्या आरती यांनीही एन्ट्री मारली. बोलता बोलता समजले की आरती Fine artist आहेत आणि आपल्या मामाकडून प्रेरणा आणि शिक्षण घेऊन लवकरच मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये त्यांच्या acrylic चित्रांचे प्रदर्शन भरवणार आहेत.



मी मूकपणे कानावर पडणारे संवाद ऐकत, खिडकीभरचे विश्व बघत निवांत बसलो होतो. इतक्यात हडपसरच्या गर्दीत गाडी घुसली आणि जाणवले की आपण आता पुण्याच्या जवळ आलो आहोत. तसं बघितलं तर फारसी वरून सुरु झालेले चार स्त्रियांचे संभाषण तासभर चालू होते.

त्यात एक होत्या accent ने बोलणाऱ्या पण अनेक विषयांची रुची आणि ज्ञान असलेल्या मंजिरी, एक होत्या IT क्षेत्रात परदेश भ्रमणाच्या अनुभवाने समृद्ध  झालेल्या रुपाली, एक होत्या आरती ज्या self -made फाईन आर्टिस्ट होत्या आणि माझ्या शेजारी, मला विंडो सीट आणि पैठणीचे थोडे का होईना भरजरी ज्ञान बहाल करणाऱ्या वैशाली.

चार वेगळ्या क्षेत्रात असलेल्या, इतिहास आणि भटकंतीची आवड असलेल्या चार यशस्वी स्त्रिया, आणि एक अनोखा, अनेक विषयांनी भरलेला तास

हा फिरस्ती महाराष्ट्र ने आयोजित केलेल्या पळसदेव आणि उजनी धरणाची वारसा सहल अविस्मरणीय ठरण्याचे ठळक कारण म्हणावे लागेल!

- धवल रामतीर्थकर

Comments

Popular posts from this blog

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

फासे पारध्यांची गोडी

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने