- धवल रामतीर्थकर
पुण्यनगरीला राम राम
ठोकून मी मुंबापुरीत साल २००२ मध्ये पाऊल टाकले. सुरुवातीचा तो काळ धकाधकीचा पण
रोमहर्षक होता. बेधुंदपणे काम करणे, रूममेट्स बरोबर शनिवार-रविवार आरामात किंवा भटकंतीत घालवणे आणि आयुष्याचा आनंद
घेणे. त्यावेळी मी खार परिसरात राहत होतो. योगायोग असा की माझा मावसभाऊ हर्षद
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्याचवेळी मुंबईत
परत आला होता. अधून मधून आमची भेट व्हायची. अशाच एका भेटीत बोलता बोलता विषय
निघाला आणि त्याने सांगितले की तो एका हार्ट सर्जनच्या हाताखाली हृदय शस्त्रक्रियेत
सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्याने जेव्हा हे सांगितलं त्यावेळी माझ्या डोक्यात 'वाह वाह... क्या बात है' यापलीकडे कोणते तारे चमकल्याचे आठवणीत नाही.
नंतर कधीतरी निवांतवेळी मनाचे
खेळ चालू असताना अचानक डोक्यात वीज चमकली. का नाही हर्षदला विचारायचं की मलाही
हार्ट सर्जरी बघायची खूप इच्छा आहे आणि मला तिथे उपस्थित राहणे शक्य होईल का?
त्याकाळी मोबाईल फोन वगैरे फार काही प्रचलित
नव्हता. पुढच्यावेळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी पुडी सोडली आणि माझी इच्छा
व्यक्त केली. जास्तीत जास्त काय तो नाही म्हणेल. आणि तो नाही म्हाणालाही. पण मी
परत परत विचारणे सोडले नाही आणि त्याने शेवटी हार मानली. पण मी हार्ट सर्जरी
बघण्यासाठी हर्षदला त्याच्या सर्जन सरांची परवानगी घ्यावी लागणार होती. एकूण आशा धूसरच होती.
पण दैव तारी त्याला कोण
मारी. ते हार्ट सर्जन ज्या शस्त्रक्रिया करत त्यात भूलतज्ञ म्हणून हर्षदच्या सख्या काकू अलका मांडके या असत.
त्यामुळे चक्रे बरोबर फिरली. हर्षदने काकूला विचारले, काकूने सर्जनला विचारले. आणि अलका मांडके विचारात आहेत म्हणजे
नाही म्हणायचं प्रश्न येतोच कुठे? हर्षदचे उत्तर
आले की हो तू एक हार्ट सर्जरी होत असताना तिथे हजार राहून बघू शकतोस आणि त्याची
परवानगी मिळाली आहे. एक अशक्य गोष्ट शक्य होणार हे जाणवल्याक्षणी जो आनंद झाला
तो वर्णन कारण्यापलिकडे आहे. त्या दिवसापासून माझ्या डोक्यात फक्त हार्ट सर्जरीचाच
विचार घोळत राहिला.
आणि तो दिवस उजाडला.
प्रसन्न रविवार. सर्जरी होणार होती नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी. वास्तविक २००५
च्या आधी नवी मुंबई कुठे आहे इथूनपासून सुरुवात होती. दुपारी चार वाजता सर्जरीची
वेळ ठरली होती आणि हर्षदने मला दहादा
बजावून सांगितले होतं की काहीही कर पण लवकर पोहोच. माझ्या उत्सुकतेपेक्षा
त्याच्यावर आलेले दडपण जास्त होते वाटतं. कारण मी उशीर केला किंवा दुसरं काही केलं
तर ओरडा त्यालाच मिळणार होता. वैद्यकीय क्षेत्रात हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या
सर्जनला खूप मान असतो आणि त्याचा रुबाब काही औरच.
कसंबसं मी वाशी स्थानकात
पोचलो. परत हर्षदला फोन करून कसं यायचा विचारलं आणि एका मोकळ्या रस्त्यावरून एका
दुमजली हॉस्पिटल मध्ये पोचला. त्या काळी वाशी म्हणजे नुसती मोकळी जागा होती.
एक्सप्रेसवे वरून पुण्याला जात असताना दोन्ही बाजूला जशी मोकळी जमीन दिसते तसंच
काही वाशी त्यावेळी होतं. हॉस्पिटल मध्ये जाताच हर्षद भेटला. त्याने मला परत
बजावून सांगितलं की शस्त्रक्रिया खोलीत बाजूला उभं राहायचं. मध्ये मध्ये एक
अक्षरही बोलायचं नाही, कोणाला काही
विचारायचं नाही. सर्जन सर जे काही सांगतील ते फक्त ऐकायचं. मी आज्ञाधारकपणे मान
डोलावली. तो म्हणेल ते करायला मी तयार होतो. कशी क्षणातच मी एका विलक्षण
प्रक्रियेचा मूक भाग होणार होतो.
पहिले माझे हात
निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्पिरिटने फवारले गेले. मग एक पांढरा झगा घालण्यासाठी दिला गेला. एव्हाने
३.४५ वाजले. मला तयार करून शस्त्रक्रिया खोलीत थांबायला सांगितले. खोलीत हर्षद
व्यतिरिक्त आणखी दोन-तीन मदतनीस होते, नर्स होत्या आणि त्यांची लगबग चालू होती. पाच मिनिटातच अलका काकू आल्या. हार्ट
सर्जन ही आले. भूलतज्ञ् असल्यामुळे अलका काकूंमध्ये आणि सर्जन सरांमध्ये एक छोटेसे
संभाषण झाले आणि किती भूल द्यायची ते यातून ठरले. त्याप्रमाणे रुग्णाला भूल
देण्यात आली आणि काही क्षणातच भूलेच्या औषधाने रुग्णाच्या शरीराचा ताबा घेतला.
औषधाचा योग्य परिणाम झाला आहे का याची खात्री करण्यात आली आणि सुरु झाली मी पाहत
असलेली हार्ट सर्जरी!!!
शस्त्रक्रिया खोलीत आता
शांतता पसरली. सर्वांचे फक्त हात हालत होते, तोंडे स्तब्ध. सर्जन आदेश देत होते आणि मदतनीस त्याप्रमाणे
लागलीच, क्षणाचाही विलंब न लावता
करत होते. मी रुग्णाच्या डाव्याबाजूला उभे राहून वैद्यकीय क्षेत्रातील एक अजब
चमत्कार बघण्यास सिद्ध झालो आणि पहिल्याच क्रियेने मला धक्का बसला.
एका स्वयंचलित करवतीने
छाती कापली जात होती. त्याक्षणी कोणी माझा
फोटो काढला असता तर किती मोठा आ केला असेल तो फोटोत बसवणे अवघड झाले असते.
काही मिनिटातच ठरल्याप्रमाणे छातीचा भाग कापला गेला आणि सुरु झाली हृदय सर्जनची
वर्षांच्या मेहनतीने कमावलेली ज्ञानरूपी जादू.
 |
| Reference Image |
अलका काकू तिथेच
रुग्णाच्या बाजूला बसल्या होत्या. त्यांच्या मागे मी उभा. मी डोकावून छातीच्या आत
काय असते, कसे असते ते बघण्याचा प्रयत्न केला पण काही
कळले नाही, अजून छाती पूर्ण उघडली
गेली नसावी. काही वेळातच मोठमोठे चिमटे लावून छातीचा भाग थोडा फाकावला गेला आणि
हृदयापर्यंत पोचणे शक्य झाले. आता सर्जन भराभर आज्ञा द्यायला लागले आणि मदनीस भरभर
त्यांना हवे ते उपकरण त्यांच्या हाती देत गेले. हालचालींवरून आणि आत्मविश्वासावरून
कळत होते की मदतनीस हे बरेच अनुभवी आणि ज्ञानाने परिपूर्ण होते.
मी परत थोडे डोकावून
बघितले आणि एक धडधडणारे हृदय दृष्टीस पडले. जिवंत हृदय डोळ्यासमोर बघताच माझ्या
हृदयाची धडधडही वेगाने वाढली. पुढची काही मिनिटे सुरु झाली सर्जन सरांची कुशल
क्रिया, मदतनीसांची हातोटी आणि हृदय समस्या असलेला रुग्ण यांच्यातली
जुगलबंदी. डोळे तपासताना डॉक्टर जसा दुर्बिणीचा चष्मा घालायला देतात तसाच दिसणारा
चष्मा सर्जनने घातला होता आणि फाकलेल्या हृदयात वाकून वाकून आपले ज्ञान सत्कारणी
लावत होते. असे अंदाजे अर्धा एक तास चालले. पूर्ण खोलीत नुसती नियोजित गडबड चालू
होती. आणि मग एका मिनिटाला सर्जन सरांनी आपल्या डोळ्यावरचे दुर्बिणीचे उपकरण काढले
आणि सुस्कारा सोडला.
अचानक खोलीतले तंग
वातावरण निवळले. सर्जन निश्चिन्त झाल्याचे जाणवले.
मदतनीसही एकमेकात गप्पा मारायला लागले. आता गप्पा म्हटलं की गप्पांचा फड जमवून
नाही बसले तर चेहऱ्यावरचे टेन्शन कमी झाले आणि एखादे वाक्य तोंडातून निघू लागले.
याचा अर्थ शस्त्रक्रिया चांगली आणि यशस्वी झाली होती.
वातावरण निवळल्याचे पाहून
अलका काकूंनी मला थोडं पुढे यायला सुचवलं. तेवढ्यात सर्जन सरांच्या लक्षात आलं की
आज नेहमीच्या लोकांशिवाय त्यांची कला बघण्यासाठी एक श्रोताही आला आहे. त्यांनी ही
मला पुढे बोलावलं आणि बिनधास्त बघ म्हणून सांगितलं. तसं बघितलं तर एकूण सर्वच हृदय
शस्त्रक्रिया करणारे तज्ञ वागण्यात,
बोलण्यात बिनधास्त असतात.
याचं एक कारण असू शकतं की हृदय शस्त्रक्रिया करताना दोन तीन तास तज्ञांच्याच
हृदयावर एवढे दडपण असणार की इतर वेळी त्यांना चेष्टा मस्करी आपोआप करावीशी वाटत
असणार.
मी एक पाऊल उभ्या
चिरलेल्या रुग्णाच्या जवळ सरकलो आणि एकदम स्पिरीटचा भपका माझ्या नाकात घुसला. शरीर
उघडल्यावर आत जंतू जाऊ नयेत म्हणून मुबलक प्रमाणात स्पिरिटचा वापर होत असावा.
हाताला स्पिरिट, स्टीलच्या उपकरणांना स्पिरिट, हातमोज्यांना स्पिरिट, अवयवांवरचे रक्त पुसायला वापरले जाणाऱ्या
कापसाच्या बोळ्याला स्पिरिट. पण भपका नाकात गेला तरी मला त्याचं फार काही वाटलं
नाही कारण समोरचा नजाराचं एवढा अविश्वसनीय, अभूतपूर्व, स्वप्नवत होता की जर सर्जन सरांनी नकळत मस्करी करण्यासाठी त्यांच्या टॉंगने
मला चिमटा जरी काढला असता तरी मला काही जाणवलं नसतं.
आपण कधी हॉस्पिटल मध्ये
किंवा डिस्पेन्सरी मध्ये हाडांचा सापळा बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल.
माझ्या समोर तसाच पण जिवंत माणसाचा छातीच्या हाडांचा कापलेला सांगाडा पसरला होता.
समोर प्रत्येक सेकंदाला धडधडणारे हृदय नाचत होतं. त्याच्या आसपास अनेक अवयव दिसत
होते, त्यातले बरेच आपले स्नायू असणार. सर्जन काका मला बाळबोध
माहिती द्यायला लागले.
स्मोकर्स लंग्स
इतक्यात मला त्या
रुग्णाच्या डाव्या बाजूला दोन छोटे,
काळे, करपलेले भाग दिसले. भरताचं वांगं भाजल्यावर कसं काळं काळं होतं अगदी तसेच ते भाग दिसत होते. मला वाटलं की
दूषित कण किंवा मळ साठवणाऱ्या पिशव्या असतील म्हणून एवढ्या काळ्या आहेत. आपल्या
शरीरात एवढा काळा अवयव असतो हे बघून मला एवढं आश्चर्य वाटलं की मी पहिल्यांदा तोंड
उघडून सर्जन काकांना विचारलं,
"हे काळे भाग कोणते आहेत?" आणि पुढच्या क्षणाला मला साक्षात्कार झाला.
 |
| Reference Image |
सर्जन काकांनी माझ्या
शंकेचं निरसन केलं, "हां, हे बघ. ही आहेत लंग्स. पण
साधे लंग्स नाहीत तर स्मोकर्स लंग्स आहेत." त्यांनी एवढं बोलल्यावर मला
विजेचा धक्का बसतो तसा धक्का बसला. आपसूक माझं तोंडही वाकडं झालं असणार. हे लंग्स, आपली फुफुसे? माझ्या तोंडून आश्चर्यचकित उद्गार निघाले. नुसते
वाचून किंवा एखाद्या सिगारेटच्या ऍड मध्ये बघून (असे काळे लंग्स ऍड मध्येही दाखवत
नाहीत) त्याची भीषणता जाणवत नाही. आपल्या डोक्यात एक निश्चित प्रतिमा असते की हृदय
म्हणजे असं लाल लाल, मेंदू म्हणजे अनेक कप्पे असलेला, सुरकुतलेला, स्नायू म्हणजे कसे एकदम भक्कम दोरखंडासारखे आणि
फुफुसे म्हणजे कशी पांढरी, मऊ आकाशातील पांढऱ्या ढगांसारखी. पण जेव्हा मी प्रत्यक्ष एका माणसाच्या
शरीरात ती काळी करपलेली फुफुसे बघितली तेव्हा ते माझ्या मेंदूत आपोआप कोरलं गेलं
आणि स्मोकिंग ची भीषणता आणि शरीरावर, विशेष करून फुफुसांवर
होणारे दुष्परिणाम खरंच धक्कादायक होते. (मी सिगारेट याआधी कधी ओढली नव्हती आणि हा
धक्का बसल्यावरही तो हलका करण्यासाठीही ओढली नाही). त्यामुळे माझी फुफुसे तरी माझ्या कल्पनेतील (माझ्या नावाला शोभणारी)
पांढरी शुभ्र, ढगांसाराखी असणार अशी आशा करू शकतो.
यंत्र तंत्र
मी हा धक्का पचवत होतो, इतक्यात अचानक परत गडबड सुरु झाली. मॉनिटर, वैद्यकीय यंत्रे बीप बीप ओरडायला
लागली, सर्जन काका परत एकाग्र झाले, मदतनिसांची धावपळ परत
सुरु झाली. मी परत एक पाऊल मागे सरकलो.
काहीतरी विपरीत घडत आहे
असं वाटलं. भराभर एक मोठं उपकरण आणलं गेलं, त्याला वायरी जोडल्या
गेल्या, नीट तपासलं गेलं आणि पुढच्या धक्क्याची सुरुवात झाली. पुढचा
अर्धा-पाऊण तास गडबड चालू राहिली आणि नंतर एकदाचं ते यंत्र थांबलं. आता वातावरण
आधीच्यापेक्षा जास्त निवळलं. मोठा धोका टळला होता, यमदूताला पटवून परत
पाठवण्यात ही टीम यशस्वी झाली होती.
नंतर मला हर्षदने
सांगितलं की मध्येच त्या रुग्णाचं हृदय बंद पडलं होतं आणि म्हणून त्याला काही वेळ
हृदय पूर्ववत होईपर्यंत व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं होतं. म्हणजेच ते यंत्र त्या
रुग्णाचं तात्पुरतं हृदय होतं आणि त्या माणसाचा जीव त्या यंत्रात होता, त्यावर अवलंबून होता तर.
 |
| Reference Image |
खरंच,
काय अद्भुत आहे हे आधुनिक विज्ञान विश्व! आणि काय अद्भुत क्षण मला अनुभवायला
मिळाले होते! पहिल्यांदा अनपेक्षिपणे नजरेस पडलेलं काळं ,
करपलेले स्मोकर्स लंग्स आणि नंतर अनिश्चितता निश्चिततेमध्ये रूपांतर करणारे
व्हेंटिलेटर यंत्र.
आता सुरु झाला
शास्त्रक्रियेचा शेवटचा भाग,
The Conclusion. म्हणजेच
शिवाशिवी. शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती, पण रुग्णाला त्याच
अवस्थेत सोडू शकत नाही ना. मग सर्जन काकांनी, मदतनीसांच्या मदतीने त्या
रुग्णाचा कापलेला छातीचा हाडांचा सांगाडा परत एकत्र बांधला. मग त्यावर असलेले
स्नायू, त्वचा याचा लेप त्या सांगाड्यावर चढवला गेला आणि मोठ्या
सुईने तो कापलेला भाग परत शिवला गेला. शस्त्रक्रियेतील हा शेवटचा अध्याय ही
सराईतपणे हाताळला गेला आणि एका यशस्वी हृदय शास्त्रकियेची सांगता झाली.
माझ्या हृदयातील एक इच्छा पूर्ण झाली आणि याचे श्रेय
माझा मावस भाऊ हर्षदला जाते. त्याचबरोबर अलका काकू ज्यांनी शब्द टाकला आणि सर्जन
ज्यांनी शब्दाचा मान ठेवून मला हृदय शस्त्रक्रिया LIVE बघण्याची परवानगी दिली.
वास्तविक पाहता लाखो करोडों लोकांतून माझ्यासारखा एखादाच असेल ज्याला वैद्यकीय
क्षेत्रातील मुख्य शास्त्रक्रियांपैकी एक हृदय शस्त्रक्रिया जवळून बघण्याचा भाग्य
लाभले.
- धवल रामतीर्थकर
Comments
Post a Comment