GPS गोंधळ

GPS गोंधळ 
aka
GPS (गोंधळलेले पळापळीचे स्रोत)

एखादी ट्रिप/ टूर म्हटलं की जशी उत्सुकता असते तसे त्याचबरोबर नियोजन ही येतं. ७ एप्रिल २०२४ रोजी 'फिरस्ती महाराष्ट्र' या इतिहासप्रेमी, भटकंतीप्रेमी ग्रुप ने पुण्यापासून १०० कि. मी. असलेले 'पळसदेव देऊळ' हेरिटेज टूर आयोजित केली होती. ऐन वेळी माझे पुण्याला जायचे ठरले आणि मी अनुरागला (फिरस्तीकार) एक सीट आहे का विचारले. नशीबाने माझ्यासाठी एक सीट शिल्लक होतीही!

आदल्या दिवशी अनुरागने पळसदेवला जाणारी बस कोणत्या मार्गाने येणार आणि किती वाजता ठरलेल्या प्रत्येक थांब्यावर पोचेल याचे सविस्तर पोस्ट टाकले. माझ्या सोयीचे स्वारगेट होते म्हणून मी लगेच कळवून टाकले. स्वारगेट ला बस पोचायची वेळ होती सकाळी ६.३०, म्हणजे तशी निवांत वेळ होती. अगदी भल्या पहाटे उठून ५-५.३० वाजता मिट्ट काळोखात बसची वाट बघायची नव्हती.

ठरल्याप्रमाणे मी ६.१५ वाजता चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर येथून शेअर रिक्षा पकडली आणि पुढच्या दहा मिनिटात मी स्वारगेट गाठले. स्वारगेट ला ठरलेला थांबा होता HP पेट्रोल पंप, टिळक रोड च्या शेवटी असलेला पापं. हा पापं भटकंती मंडळींसाठी नित्यनियमचा थांबा आहे. मी ही अनेक वेळा सकाळी सकाळी या पेट्रोल पंप वर थांबलो आहे. पण याच दिवशी माझ्या मेंदूच्या GPS यंत्रणेने भयंकर असा गोंधळ घातला. 

मी स्वारगेट्च्या नटराज हॉटेल वर पोचलोच होतो आणि ६.३५ वाजता अनुरागचा फोन आला, "कुठे आहेस?" मी सांगितलं, "नटराज हॉटेल, दोन मिनटात पोचतोच आहे ठरलेल्या ठिकाणी." असं म्हणून मी फोन ठेवला आणि चालायला लागलो. दोनच मिनिटांनी लक्षात आले की आपण सारस बागेकडे चाललो आहोत. म्हटलं, 'बरोबरच आहे ना, तिकडून उजवीकडे वळलं आणि थोडं पुढे गेलं की टिळक रोड सुरु होतो आणि तिथेच तर आहे हा पंप' असे मनाशी बोलून झाले आणि मी झपाझप चालायला लागलो. सरस बाग पार केली, उजवीकडे वळलो, व्यंगचित्रकार भवन पार केले आणि टिळक रोडच्या मुखाशी आलो. आणि ते दृश्य बघून मेंदूच्या GPS यंत्रणेला झटका लागला, कारण इथे तर पेट्रोल पंप नव्हताच. अचानक ट्यूब पेटली आणि डोक्यातला अंधकार नाहीसा झाला. मला कुठे जायचे आहे ते एकदम साफ झाले. 

माझी चुकलेली भ्रमण फेरी


लगेच माझ्या पाउलांनी U-टर्न मारला. तेवढ्यात अनुराग चा परत फोन आला. "कुठे? आम्ही वाट बघतोय." परत २ मिनिटात पोचतो आहे असं सांगितलं आणि पाउलांचा वेग वाढवला. पोचलो तेव्हा व्हॅन आणि अनुराग, दोघे टिळक रोड वरच्या शेवटच्या HP पंप वर माझी वाट बघत थांबले होते. वास्तविक नटराज हॉटेल पासून हा पेट्रोल पंप फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होता. मला स्वारगेट ला पोचून २० मिनिटे झाली असतानाही  १० मिनिटे उशीर झाला होता, मला व्हॅन पर्यंत पोचायला ६.५० झाले. म्हणजे मी २० मिनिटे चालत होतो. 



मला येताना बघताच अनुरागने हसतमुखाने स्वागत केले. मी उशिरा पोचायची दिलगिरी व्यक्त केली, व्हॅन मध्ये स्थानापन्न झालो आणि आमची पळसदेव च्या दिशेने कूच सुरु झाली. 

GPS गुंता सुटला

काही वेळाने मी विचार केला की माझा GPS इतका कसा गंडु शकतो?! आणि उत्तर आपोआप सापडले. काही वर्षांपूर्वी स्वारगेट वर उड्डाणपूल अस्तित्वात आला. यामुळे जेव्हा केव्हा टिळक रोडवर जायचे असेल तेव्हा बाईक वरून किंवा गाडीतून स्वारगेट खाली सोडून उड्डाणपुलावरून थेट सारस बाग येथे रस्ता उतरत असू, आणि याचमुळे टिळक रोडचा शेवटचा म्हणजेच स्वारगेटकडचा भाग आपसूक विसरला गेला होता, मेंदूच्या पटलावरून पुसला गेला होता. 

म्हणूनच २ मिनिटांच्या अंतरासाठी मी २० मिनिटे चाललो होतो तर!

- धवल रामतीर्थकर


Comments

Popular posts from this blog

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

फासे पारध्यांची गोडी

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने